आडिवरे येथील रस्त्याची दुरावस्था..बांधकाम खात्याचे दुर्लक्ष..

 

ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची भेट येऊन व्यथा मांडणार..

ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत…

जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील सागरी महामार्गावरील आडीवरे येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक अपघात घडत आहेत.

वाडापेठ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थान च्या समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत . या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात होत आहेत. विशेषता या खड्ड्यात अडकून अनेक महिला दुचाकीस्वार दुखापतग्रस्त होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

श्री महाकाली देवस्थानच्या समोरील या रस्त्यावर दरवर्षी अशाच पद्धतीने मोठमोठे खड्डे पडत असून दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते या महामार्गावरील वाडापेठ एसटी स्टँड ते भगवती मंदिर या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर असून यासाठी निधीही मंजूर झालेला आहे मात्र हे काम मागील तीन वर्षांपासून रखडलेले आहे असे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले आहे .दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते मात्र या भागातील हे डांबरीकरण पूर्णतः वाहून गेल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात या भागात जांभे दगड आणून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न बांधकाम खात्याने केला होता. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नसून या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत.

वाडा पेठ ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील रूमडे यांनी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी वारंवार विनंती करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री महाकालीचे देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक गावात येत असतात मात्र देवस्थान समोरील या रस्त्याची दुरावस्था पाहून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत असते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजूर असलेला सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तात्काळ करावा अशी विनंती केलेली असताना देखील अद्याप त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. पुढील आठ दिवसात या रस्त्यासाठी ठोस उपाययोजना केली गेली नाही तर आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण आणि नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.तसेच या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.