सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे यांचे संजय रांजणे यांना आदेश
मागण्या मान्य झाल्याने आसगे सोसायटी चेअरमन दिलीप चौगुले यांचे उपोषण मागे
संतोष कोत्रे l लांजा :- संस्थेच्या सचिव पदावरून कमी केल्याचा ठराव संमत केलेला असल्याने आपल्याकडे असलेल्या संस्थेचा दप्तराचा ताबा संबंधितांकडे सुपूर्द करा असा आदेश सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे यांनी आसगे सोसायटीचे सचिव संजय रांजणे यांना दिले. त्याचप्रमाणे चुकीच्या व्यक्तीने अध्यक्ष म्हणून चेकवर खाडाखोड करून सह्या केल्या याची देखील खातरजमा करून आपले लेखापरीक्षण अहवाल याबाबत शेरे नमूद करण्यात यावेत अशा सूचना सहाय्यक निबंधक यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर अन्याय सर्वच मागण्यांबाबत योग्य समर्पक अशी उत्तरे मिळाल्याने आसगे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सचिव संजय रांजणे यांच्या गैरकारभाराविरोधात अध्यक्ष दिलीप चौगुले यांनी छेडलेले आमरण उपोषण आज मागे घेतले .
आसगे विकास सोसायटीचे सचिव संजय रांजणे यांच्या गैर कारभाराविरोधात संस्थेचे अध्यक्ष दिलीप चौगुले यांनी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण छेडले होते. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, संजय रांजणे हे सचिव म्हणून काम करत असताना त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक दोष आढळून आले होते. त्यामुळे दिनांक २३/०९/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सभेने ठराव करून त्यांना सचिव पदावरून कमी केले होते. तरीही त्यानंतर संजय रांजणे यांनी इतर सदस्यांना हाताशी धरून परस्परिता संस्थेचा कारभार करणे सुरू ठेवले होते. त्याचप्रमाणे दिनांक २७/०९/२०२३ रोजी संस्थेची सभा घेण्यात येऊन सचिव संजय रांजणे यांना सचिव पदावरून एकमताने काढून टाकण्यात आले. तसे पत्र देखील देण्यात आले होते .
परंतु आजतागायत सचिव रांजणे यांनी संस्थेच्या दप्तरचा ताबा अध्यक्ष यांच्याकडे दिलेला नव्हता. तसेच अध्यक्ष म्हणून आपणास पूर्णपणे अंधारात ठेवून आणि काही संचालकांना हाताशी धरून साचिव संजय रांजणे यांनी संस्थेमध्ये गैरव्यवहार सुरु ठेवला होता. संस्थेच्या नियमानुसार एखादा संचालक तीन सभांना गैरहजर राहिल्यास त्यांचे संचालक पद नियमानुसार रद्द होते. अशा संचालक पदावरून कमी केल्या व्यक्तीच्या अध्यक्ष म्हणून सह्या घेऊन काही कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. यामध्ये दिनांक २२/७/२०२३ रोजीचा धनादेश ०२७१११, दिनांक १३/०९/२०२३चा धनादेश क्रं. ०२७१२५, दिनांक २९/०९/२०२३ चा धनादेश क्रं. ०२७१२६ यासह अन्य धनादेशांवर अध्यक्ष म्हणून परस्परित्या संतोष रघुनाथ निवदेकर यांनी सही केली आहे. तर काही चेक मध्ये खाडाखोड करून पीक कर्ज दिली आहेत.
अशा प्रकारे सचिव पदावरून काढून टाकलेला असताना संस्थेचे दप्तर स्वतःकडे ठेवून संस्थेच्या रक्कमांचे व्यवहार करून एकप्रकारे संस्थेशी गैरव्यवहार केला आहे. तसेच संचालक म्हणून अपात्र झालेले असताना संतोष निवदेकर यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सही करून संस्थेची फसवणूक केलेली आहे .त्यामुळे या सर्व गैर व्यवहाराची सखोल चौकशी करून दोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष दिलीप चौगुले यांनी केली होती. आणि त्यासाठीच १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण केले होते .
या पार्श्वभूमीवर सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे यांनी आज शुक्रवारी संस्थाध्यक्ष दिलीप चौगुले यांची भेट घेतली. तसेच संजय रांजणे यांना तुमच्याकडे असलेल्या संस्थेच्या दप्तराचा ताबा तात्काळ संबंधितांकडे सुपूर्द करण्याच्या आदेश दिले. तसेच अध्यक्ष म्हणून असेही चे अधिकार नसताना परस्परच्या चुकीच्या व्यक्तीने सह्या करून फसवणूक केल्या प्रकरणाचा अहवाल शेरे नमूद करण्यात यावे अशा सूचना देखील त्यांनी लेखापरीक्षक सहकारी संस्था लांजा संदीप डाफळे यांना दिले आहेत. त्याबाबतचे पत्र त्यांना देखील दिले आहे .
अशा प्रकारे मागण्या मान्य झाल्याने अध्यक्ष दिलीप चौगुले यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता आपले उपोषण मागे घेतले









