लांजा( प्रतिनिधी) देवगडहून चिपळूण कडे जाणारा ४३ वर्षीय व्यक्ती लांजा बस स्थानक येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .ही घटना दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री १.४५ च्या सुमारास घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील रहिवासी असलेला प्रदीप शंकर भातवकर (वय ४३ वर्षे) हा देवगड येथे कामाला असून तब्येत बरी नसल्याने तो दिनांक ९ ऑगस्ट रोजी देवगडहून चिपळूण येथे आपल्या गावी चालला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र योगेश जनार्दन सैतवडेकर ( वय ३५, राहणार गोवळकोट भोईवाडी ) हा देखील होता. हे दोघे चिपळूण येथे जात असताना दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री लांजा येथे उतरल्यानंतर लांजा एसटी बस स्थानक येथील एका टपरीवर हे दोघेजण झोपले होते. या दरम्यान प्रदीप भातवकर हा मित्राचा डोळा चुकवून काहीही न सांगता कुठेतरी निघून गेला. तो परत आला नाही, म्हणून मित्र योगेश सैतवडेकर याने लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे .
याबाबत लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत. सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास त्यांनी लांजा पोलीस ठाणे, दूरध्वनी क्रमांक ०२३५१-२३००३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











