देवरूख | प्रतिनिधी : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी मिहीर उदय भाट्ये याची दिल्ली येथील ऑल इंडिया एनसीसी कॅम्पसाठी निवड झाली आहे. तो या कॅम्पसाठी नुकताच रवाना झाला आहे.
मिहीर भाट्ये हा देवरूख हायस्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच त्याला एनसीसी मध्ये आवड आहे. आतापर्यंत त्याचे एनसीसीचे ७ कॅम्प झाले आहेत. एनसीसी कॅडेट मिहीरची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी कॅम्पसाठी निवड झाली आहे. तो या ८ व्या कॅम्पसाठी दिल्लीला रवाना झाला आहे. यापूर्वी त्याने फ्री आयटीसी शूटिंग कॅम्प ओरोस (सिंधुदुर्ग) तसेच पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद अशा ठिकाणी त्याने कॅम्प केले आहेत.
मिहीरला ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी ओरसचे कमाडिंग ऑफिसर तसेच कोल्हापूर ग्रुप कमांडर, शाळेतील एनसीसी ऑफिसर सुनील कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत, शाळा समिती अध्यक्षा सौ. नेहाताई जोशी, मुख्याध्यापक श्री. मधुकर कोकणी, पर्यवेक्षक श्री. अनंतकुमार मोघे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिहीरचे अभिनंदन केले असून दिल्ली येथील कॅम्पसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.












