काँक्रिटीकरण व अन्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत लांजा शहर समन्वय समितीची तीव्र नाराजी 

 

 मुख्याधिकाऱ्यांची मात्र आश्वासनांची खैरात तर नगराध्यक्ष अनुपस्थित 

 संतोष कोत्रे l       लांजा -: काँक्रिटीकरणानंतर अवघ्या तीन महिन्यात रस्त्याची झालेली दुरवस्था, अंतर्गत रस्त्यांबाबत वेळोवेळी मागणी करूनही दुरुस्ती व डागडुजीबाबत नगरपंचायतीकडून करण्यात येणारे दुर्लक्ष आणि शहरातील इतर सर्वच समस्यांबाबत नगरपंचायतीची असलेली उदासीन भूमिका याबाबत आज लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान लांजा शहरातील गावकरी, मानकरी या समन्वय समीतीचे बैठकीला उपस्थित असताना लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी बैठकीला दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान शहरातील रस्त्यां बाबत निरीक्षण आणि परीक्षण या दोन्ही बाबींबाबत आपले अभियंता व आपण जातीनिशी अभ्यास करून संयुक्तरीत्या त्यांचा अहवाल तयार करावा. काही अयोग्य असल्यास रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लांजा शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या संदर्भात लांजातील प्रमुख मंडळींनी एकत्र येत शहर समन्वय समितीची स्थापना केली आहे .या शहर समन्वय समितीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, तुंबलेली गटारे, मोकाट गुरे, कुत्र्यांचा वाढलेला उपद्रव, सांडपाण्याचा प्रश्न, अनधिकृत घरपट्टी आदी विविध समस्यांसंदर्भात यापूर्वी लांजा शहर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेऊन या समस्या मार्गी लावण्या संदर्भात चर्चा केली होती. मात्र दोन महिन्यानंतर अद्यापही या समस्यांची पूर्तता न झाल्याने आज पुन्हा एकदा लांजा शहर समन्वय समितीचे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी हर्षला राणे यांची भेट घेतली. यावेळी मागील प्रश्नांची अद्यापही सोडवणूक न झाल्याने या सर्व समन्वय समितीचे पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली .

लांजा शहरातील नव्याने बनवण्यात आलेले रस्ते हे खाली आणि गटारे उंच अशी परिस्थिती आहे. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्गच नसल्याने बऱ्याच ठिकाणी तुंबलेले गटारे आणि सांडपाण्याचा पाणी प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब देखील यावेळी मांडण्यात आली. शहरात नव्याने तयार करण्यात आलेले म्हणजे एप्रिल- मे महिन्यात तयार करण्यात आलेल्या कॉंक्रीट रस्त्यांच्या मुखपृष्ठावरील खडी दिसू लागली आहे. त्यामुळे या कामांच्या बाबतीत एकूणच संशय निर्माण होत आहे निकृष्ट दर्जाची पद्धतीमुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होत असून अशा प्रकारचे रस्ते करत असताना ते मशीनद्वारे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली‌. त्याचप्रमाणे शहरातील विविध रस्त्यांची कामे ही होत असताना नगरपंचायतीचे अभियंत्यांकडून

या ठिकाणी कामाची कामाची पाहणी केली जात नाही आणि त्यामुळेच कामाचा दर्जा देखील खालावला असल्याची खंत यावेळी व्यक्त केली .

लांजा शाळा नंबर पाच आणि लांजा सिनीअर कॉलेज कडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्यांची गेल्या अनेक वर्षात डांबरीकरण झाली नसल्याने पूर्णतः दुरावस्था आली आहे. समन्वय समितीच्या वतीने ही बाब नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही कॉलेज कडे जाणारा रस्ता हा डांबरीकरण झाला आहे, मात्र ही जागा पाणथळ असल्याने या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता अपेक्षित होता. तर शाळा नं. ५ या रस्त्याच्या शेजारी गटारे नसणे आणि बाजूला अनधिकृत ओके असल्याने नगरपंचायत कडून योग्य ती कार्यवाही होऊ शकलेली नाही. याबाबत पदाधिकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे अशा परिस्थितीत लांजा नगरपंचायतीने फिरत्या शौचालयाची व्यवस्था करावी .ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी शौचालय आणि मुताऱ्यांची देखील व्यवस्था करावी. महामार्ग क्रॉसिंगसाठी सद्यस्थितीत शहरात उभारण्यात आलेल्या पिलर्सचे

मध्यभागी असलेल्या जागेत अनधिकृत खोके उभारण्यात आले आहेत त्यामुळे रस्ता क्रॉस करताना मोठी अडचण निर्माण होत आहे .त्यामुळे नगरपंचायतीने या ठिकाणी रस्ता क्रॉस करण्याच्या दृष्टीने पट्टे मारून ती जागा आरक्षित ठेवावी, त्याचप्रमाणे नो पार्किंग, पार्किंग यांचे बॅनर लावावेत शहरातील बंदिस्त गटरांवरील झाकणे ही चांगल्या दर्जाची असावी आदी बाबत चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी हर्षला राणे यांनी नेहमी प्रमाणेच हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी शहर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये ,उपाध्यक्ष प्रकाश लांजेकर, उपाध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव चंद्रशेखर स्वामी, सहसचिव निरंजन देशमुख, ॲड . अभिजीत जेधे, महंमद रखांगी, त्याचप्रमाणे जयवंत शेट्ये ,विजय कुरूप , मंदार भिंगार्डे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .