मसुरे | झुंजार पेडणेकर
मसुरे मेढावाडी येथील प्रभाकर सदाशिव माने यांच्या घराला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागून पूर्ण घर आगीत भस्मसात झाले. यावेळी घरात असलेले प्रभाकर माने ( 78 वर्ष ) हे सुमारे 80 टक्के भाजल्याने त्यांचे निधन झाले असून त्यांची पत्नी शुभदा माने (70 वर्ष ) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचार चालू आहेत. मालवण नगरपंचायतचा अग्निशमक बंब आल्यानंतर आगीवार नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रभाकर माने आपल्या पत्नीसह आजच सकाळी मुंबई येथून गणेशोत्सव निमित्त मसुरे येथे आले होते. दुपारी जेवण वैगरे केल्या नंतर माने हे एका खोलीत आराम करत होते. दरम्यान शेजारील घरातील आपा सावंत यांना छपरातून धूर येत असल्याचे दिसू लागल्याने त्यांनी घरात पहिले असता दर्शनी भागातून घराच्या छपराला आग लागल्याचे दिसून आले. लागलीच शेजारील महिला व ग्रामस्थांनी घरात धाव घेत त्यांना बाहेर येण्यास सांगितले. दरम्यान आगीने जोरात पेट घेतल्याने खोलीत असलेले प्रभाकर माने बाहेर पडू शकले नाही.तर शुभदा माने या घराबाहेर पडत असताना अंगणात पडल्याने जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे उपचार करून सिटी स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
दरम्यान प्रभाकर माने हे खोलीत असल्याने निदर्शनास आले नाहीत. ग्रामस्थांनी पेटत्या घरात प्रवेश करत पहिले असता एका खोलीत जळलेल्या अवस्थेत ते आढळून आले. ग्रामस्थांनी त्यांना बाहेर आणत अधिक उपचारासाठी नेले. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे यांनी सांगितले.
दुपारी चारच्या सुमारास लागलेली आग तासाभरात अधिक जोरात भडकल्याने ग्रामस्थांचे आग विझविण्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले. मालवण नगरपंचायत चा अग्निशमक बंब बोलावण्यात आल्या नंतर सायंकाळी पाच च्या सुमारास हा बंब त्वरित दाखल झाला. घराच्या छपराला आग लागल्याने बाजूच्या दोन घराना आगी मुळे धोका निर्माण झाला होता.अग्निशमक बंब आल्यानंतर आगीवार नियंत्रण मिळविण्यात यश आले
घराला लागलेल्या आगीने छप्पर पेटले होते. व संपूर्ण लाकूड सामान पेटत घरात पडत होते. त्यावेळी स्वयंपाकघरात असलेला सिलेंडर बाहेर काढणे आवश्यक होते. येथील राजू बागवे यांनी घरात प्रवेश करत सिलेंडर घराबाहेर आणल्याने पुढील अनर्थ टळला. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर,पोलीस विवेक फरांदे, उपसरपंच राजेश गावकर, शिवाजी परब, संग्राम प्रभूगावकर, छोटू ठाकूर, सौ लक्ष्मी पेडणेकर, डॉ विश्वास साठे, जगदीश चव्हाण, बाबू आंगणे, कोतवाल सचिन चव्हाण, विनोद मोरे, सुदर्शन मसूरकर यांनी पाहणी करत मदत कार्यात सहभाग घेतला.
विजवितरण कर्मचारी अमित बागवे, श्री परब यांनी दाखल होत वीज पुरवठा खंडित केला. यावेळी राजू सावंत, भाऊ परब, बाबू चव्हाण, जगदीश चव्हाण, शरद मोरे, शिवाजी परब, भाई सुर्वे, अप्पा सावंत, अनिल सावंत, संजय मोरे, किरण पाटील, सचिन पाटकर, राजेश गावकर, नंदू शिरसाठ, भाई सुर्वे, राजू म्हाडगूत, अजित म्हाडगूत, रोहन म्हाडगूत, विनोद मसूरकर, प्रभाकर सावंत, बाबू चव्हाण, किशोर वायंगणकर, योगेश म्हाडगुत, नीळकंठ शिरसाठ आदिसह ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला.













