न. प. प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सतर्क
संपुर्ण शहरात औषध फवारणी करण्याची मागणी
राजापूर (वार्ताहर): राजापूर शहर आणि तालुका परिसरात मलेरिया सदृश्य प्लास्मोडियम वायवॅक्स, प्लाझमोडियम फॅल्सीपेरम साथीच्या आजाराचे चार रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राजापूर नगर परिषदेने शहराच्या काही भागात डास प्रतिबंधात्मक फवारणी केली आहे. मात्र साथीचा फैलाव होवू नये म्हणून संपूर्ण शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात यावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चा सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद राजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील गुजराळी येथील एका नागरिकास या आजाराची लागण झाली आहे. तर तालुक्यातील अन्य तीन गावांत प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.
या मलेरिया सदृश्य साथीचा प्रसार संक्रमित मादी अॅनोफिलीस डासाच्या चावण्याने होतो. मलेरिया संक्रमित लोकांकडून रक्त संक्रमणाने मलेरिया संक्रमित व्यक्तीला डास चावल्यानंतर रोगाचा डास होतो आणि संक्रमित डास नंतर संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा मलेरिया पसरतो. मलेरियाचे परजीवी त्या व्यक्तीच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि यकृतात जातात. अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. अशुद्ध पाणवठे हे या डासांचे उत्पत्तीचे स्थान आहे असेही सांगण्यात आले. योग्य वेळी योग्य उपचार न केल्यास संबंधित आजार हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो.
गुजराळी भागातील नागरिकास हा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यावर या भागातील सामाजिक कार्यकर्त्या व भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी राजापूर नगर परिषदेला निवेदन देत डास प्रतिबंधात्मक फवारणीची मागणी केली. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनीही तातडीने याबाबत कार्यवाही करत गुजराळी भागात डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे आरोग्य विभागाकडून गुजराळी भागात डास प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली.
तर शहराच्या अन्य भागातही डास प्रतिबंधक फवारणी करून तसेच आरोग्य तपासणी करून लोकांना या साथीच्या रोगापासून दूर राहण्यासाठी आपल्या आरोग्य विभागाकडून मदतीची अपेक्षा आहे.











