शिरशिंगे शिवापूर रस्ताप्रश्नी स्टेज १ ची मान्यता तीन महिन्यात

Approval of Shirshinge Shivpur Road Question Stage 1 in three months

कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या आश्वासनाअंती स्थानिकांचे उपोषण स्थगित

निलेश राणे, राजन तेलींसह केसरकरांची मध्यस्थी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी । प्रतिनिधी : प्रशासनाच्या लाल फितीत अडकलेल्या शिरशिंगे शिवापूर रस्त्याच्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी आश्वासन देऊनही कोणतीही हालचाल प्रशासनाकडून दिसत नसल्याने सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांनी सोमवारी महाराष्ट्र दिनी पुकारलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी या रस्ताप्रश्नी स्टेज १ ची मान्यता तीन महिन्यांत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला. हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरीही योग्य वेळेत कार्यवाही न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.

सावंतवाडी कुडाळ तालुक्याला जोडणारा शिरशिंगे ते शिवापुर असा रस्ता पाच वर्षाहून अधिक काळ रेंगाळलेला होता. सदरचा रस्ता साडेतीन किलोमीटर वन जमिनीमध्ये अडकला असून हा रस्ता झाल्यास दोन तालुक्यांची गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. तसेच ऐतिहासिक मनोहर संतोष गडाकडे जाणारा हा मार्ग आहे. या रस्त्या संदर्भात मंत्रालय स्तरावर वन संज्ञा जमीनीबाबत २०१९ मध्ये पहिली बैठक झाली. त्यानंतर अनेक बैठका व आंदोलने होऊनही आश्वासना व्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर दोन्ही गावच्या व पंचक्रोशीच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी १ मे रोजी लाक्षणिय उपोषण छेडले.

या उपोषणाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी चर्चा करून याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून चर्चा करत याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर कोल्हापूरचे पालकमंत्री तथा स्थानिक आमदार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही कार्यकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधत कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन वनविभागाच्या पर्यायी जागे संदर्भातील रखडलेला प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

अखेर राजन तेली यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी या रस्त्यासाठी वनविभागाला गाव मांजरे येथील ३.७० हेक्टर जागा पर्यायी क्षेत्र म्हणून देण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रक्रिया पूर्ण झालेली नसून ती पूर्ण करून वनीकरणाची नवीन पॉलिगॉन – केएमइल फाईल ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अपलोड करणे वस्टेज १ ची मान्यता तीन महिन्यात प्राप्त करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे सदरचे लाक्षणिक उपोषण राजन तेली यांच्या मध्यस्थीने थांबविण्यात आले.यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब, माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, माजी जि.प. सदस्य पंढरीनाथ राऊळ, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, सरपंच सुमिता शेडगे, शिवसेनेचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के, सुरेश राऊळ, मधुकर राणे, संतोष चव्हाण, शुभम घावरे, नारायण गुंजार, संतोष शेडगे, सिद्धेश पाटकर, सुरेश राऊळ, सागर राऊळ,अमोल राऊळ , मधुकर राणे, अरुण कदम, शांताराम कदम आदी उपस्थित होते.