दापोली l प्रतिनिधी-काँग्रेस (आय) पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सलग 15 वर्षे दापोली तालुका कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा वाहणारे श्री. अनंत तथा भाऊ मोहिते यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून या घटनेने दापोली तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
श्री. अनंत तथा भाऊ मोहिते यांनी आपल्या शासकीय नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर समाजसेवेला आपले आयुष्य वाहून दिले होते. त्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप यांनी श्री. भाऊ मोहिते यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतले. दापोली तालुक्यामध्ये कॉंग्रेसच्या पडत्या काळात श्री. भाऊ मोहिते यांनी गावागावात काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना दापोली तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. सलग 15 वर्षे त्यांनी ही धुरा यशस्वीपणे सांभाळत संपूर्ण तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व राखून ठेवले आहे. वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू सहकारी म्हणून भाऊ मोहिते यांची प्रदेश पासून ओळख आहे.
श्री. भाऊ मोहिते यांनी दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले असून बौध्दजन मध्यवर्ता कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे दापोली शिक्षण संस्थेवर देखील त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे दापोली शहरामध्ये श्री. भाऊ मोहिते शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने त्यांचे पँरामेडिकल कॉलेजही कार्यरत आहे. श्री. मोहिते यांनी आपल्या काँग्रेस पक्षातील तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आगामी काळात कॉंग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्री. भाऊ मोहिते हे कॉंग्रेसमधील आपल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांसह दि. 28 ऑक्टोबर रोजी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. श्री. मोहिते यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यास बहुजन समाजातील एक आश्वासक चेहरा या पक्षाला मिळेल यामध्ये कोणतीही शंका नसल्याचे सांगण्यात आले आहे.











