राजापूर (प्रतिनिधी): शाळेत सरस्वती पूजनाच्या निमित्ताने गरबा नृत्य खेळत असताना चक्कर येवून पडल्याने मयत झालेल्या आजिवली मानेवाडी येथील कु. वैष्णवी लक्ष्मण माने हिच्या मृत्युपकरणी वडील लक्ष्मण माने यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पाचल येथील सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक तानाजी देसाई यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यातील आजिवली, मानेवाडी येथील कु.वैष्णवी लक्ष्मण माने ही पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती. नवरात्रोत्सवात दि.१० ऑक्टोबर २०२४ रोजी सरस्वती पुजनाच्या निमित्ताने शाळेत गरबा नृत्य खेळत असताना चक्कर येवून पडल्याने वैष्णवी हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान गरबा नृत्याचा कार्यकम दुपारी २ वाजता कडक उन्हामध्ये उघड्या मैदानात घेण्यात आला होता. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नव्हती. तसेच सदर कार्यक्रमासाठी मोठ्या आवाजाचा डीजे लावण्यात आला होता. कार्यकमाच्या ठिकाणी मुख्याध्यापक तसेच शिक्षक यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.
प्रचंड कडक उन्हाच्या झळा आणि डीजेच्या आवाजामुळे माझी मुलगी वैष्णवी ही खाली कोसळली. त्यावेळी तिच्या मैत्रीणींनी आरडाओरड करून गाडी आणा व वैष्णवीला हॉस्पीटलला न्या असे सांगितले. मात्र ती जवळपास १० मिनिटे मैदानावर उन्हात पडून होती. तेथूनच तिला डॉक्टरकडे नेले असते तर ती वाचली असती. शाळेच्या शेजारीच डॉक्टर आहेत. तसेच पाचलमध्ये देखील खाजगी डॉक्टर आहेत. परंतु तिला तेथून उचलून हॉलमध्ये नेले गेले. तेथून सुमारे २० ते ३० मिनिटे तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस मुख्याध्यापक तानाजी देसाई यांनी, तिला चक्कर आली आहे, ती थोड्या वेळाने बरी होईल, असे सांगून दुर्लक्ष केले.
सुमारे ४० मिनीटानंतर तिला शिक्षकांच्या गाडीतून ग्रामीण रूग्णालय, रायपाटण येथे नेले. रूग्णालयात गेल्यावर सुदधा डॉक्टर १० ते १५ मिनिटे उशीराने आले. तिचा श्वास गुदरमरल्याने तिला तात्काळ ऑक्सीजनची गरज असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करायचे सोडून १०८ नंबरला फोन करा असे सांगून दिरंगाई केली. शाळेतील मुख्याध्यापक यांनी संवेदनशीलता दाखवून वेळीच डॉक्टरांकडे नेले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता. मुख्याध्यापकांच्या कुचराईमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्ष्मण माने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार राजापूर पोलिसांनी मुख्याध्यापक देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












