नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचा मतदार संघात दाखल होताच कामाचा धडाका

राजापूरात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार किरण सामंत याप्रसंगी अमोल ओटवणेकर, विकास गंबरे, प्रकाश कुवळेकर, अशफाक हाजू, दीपक नागले, भास्कर सुतार, सौरभ खडपे आदी.

 

सर्व प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला कामकाजाचा आढावा
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाण्याच्या प्रशासनाला सूचना

राजापूर | प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक निकालानंतर मुंबईत गेलेल्या शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करून त्यांना परत मतदार संघात जा आणि कामाला लागा असे आदेश शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्याची तात्काळ अमंलबजावणी करत राजापूर, लांजा साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत हे बुधवारी राजापूरा दाखल झाले आणि पहिल्याच दिवशी सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेत आपल्या भविष्यातील कार्यपध्दीची झलक दाखविली.

तर राजापूर आगारातील एकूणच वाहतुक व्यवस्था, आगार परिसर व सुलभ शौचालयाची पहाणी केली. त्यानंतर ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत तेथील पहाणी केली.
बुधवारी राजापूरात दाखल होताच आमदार किरण सामंत यांनी सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात झालेल्या या बैठकीप्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दिपक नागले, समन्वयक प्रकाश कुवळेकर, शहर प्रमुख सौरभ खडपे, भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर सुतार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आ. सामंत यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांकडून त्यांच्या विभागातील कामे, प्रलंबित कामे, रिक्त पदे व अन्य कामांबाबत माहिती घेतली. यामध्ये महसूल, आरोग्य, शिक्षण, पशुसवंर्धन, वन विभाग, एसटी महामंडळ, अंगणवाडी सेविका, महावितरण, कृषी, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा सर्व विभागांचा त्यांना आढावा घेतला.

या आढाव्यानंतर मार्गदर्शन करताना आ. सामंत यांनी भविष्यात आपल्याला राजापूर विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगणिक विकासाठी काम करावयाचे आहे. तुमच्या विभागाशी निगडीत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी आहे. मात्र चांगल्या पध्दतीने काम करून आपण सर्वांनी साथ द्यावयाची आहे असे नमुद केले. सर्व प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्पर रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला जनतेसाठी काम करायचे आहे हे लक्षात ठेऊन काम करा असेही त्यांनी सांगितले.
ज्या विभागात रिक्त पदे आहेत, ज्यांचा इमारतीचा प्रश्न आहे, प्रलंबीत प्रस्ताव आहेत, ज्यांना आवश्यक लागणारी यंत्रणा नाही अशा सर्व कामांबाबतचा अहवाल आपल्याला सोमवार पर्यंत सर्व विभागाच्या प्रमुखांनी द्यावा. जेणेकरून त्यावर मला लवकरात लवकर कार्यवाही करणे सोपे होईल असेही आ. सामंत यांनी नमुद केले.