मुंबई विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेची चँम्पियनशीप श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेज रत्नागिरीला

रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजच्या मार्तंड झोरे याने नेत्रदीपक कामगिरी करत फॉईल प्रकारात रौप्यपदक आणि ईपी प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. यामुळे मुंबई विद्यापीठाची चॅम्पियनशीप महाविद्यालयाला मिळाली आहे. तलवारबाजी क्रीडा प्रकारामध्ये रत्नागिरीचे नाव प्रथमच कोरलं गेलं आहे. याबद्दल मार्तंड झोरे याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या सुयशानंतर मार्तंड झोरे याची ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड होऊन त्या स्पर्धा जम्मू काश्मिर येथे झाल्या. त्यामध्ये ईपी प्रकारात सातवी रँक मिळवत यशाची परंपरा कायम राखली असून जानेवारी 2025 मध्ये होणार्‍या खेलो इंडियासाठी त्याची निवड झाली आहे. या त्याच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सर्व संस्था पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विशेष अभिनंदन केले.

मार्तंड झोरे याला आई वडीलांचे आणि महाविद्यालयाच्या स्पर्धा विभागाच्या प्रमुख सहा. प्रा. सौ. संयोगिता सासने यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयामध्ये पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष एल एल.बी. या वर्गात शिकत असताना मार्तंड झोरे याने तलवारबाजी स्पर्धेत केलेली नेत्रदीपक कामगिरी या क्षेत्रात येणार्‍या नवागतांना निश्‍चितच मार्गदर्शक ठरणारी आणि प्रेरणादायी अशीच आहे. खेलो इंडियासाठी झालेली निवड ही बाब देखील त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी तसेच रत्नागिरीसाठी खास असून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.