साखरपा | वार्ताहर : आज दिनांक 5/5/2023 रोजी रात्री 11 वाजता मौजे साखरपा पैकी गोवरेवाडी येथील सार्वजनिक विहिरी मध्ये बिबट्या मृत अवस्थेत पाण्यावर तरंगत असेल बाबत सरपंच श्री.ओमकार संजय कोलते यांनी परिमंडळ वनअधिकारी श्री.तौफिक मुल्ला यांना कळविले नुसार दिनांक 6/5/2023 रोजी सकाळी 7 वाजता परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार परिमंडळ वनअधिकारी देवरूख श्री.तौफिक मुल्ला ,वनरक्षक आरवली आकाश कडूकर ,वनरक्षक दाभोळे अरुण माळी, वनरक्षक राजाराम पाटील, वनरक्षक रणजित पाटील, वनरक्षक संजय रणधीर यांचे समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी करता गोवरेवाडीस पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी मध्ये बिबट्या मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आला. परिसराची पाहणी करता विहिरीला 3 फूट उंचीचा कठडा असून विहिर सुमारे 50 फूट खोल असून त्यामध्ये 10 फुटा पर्यंत पाणी आहे तर रुंदी 18 फूट आहे.तसेच सदर विहीर ही शेड नेट चे साहाय्याने झाकून घेतली होती तसेच गेले तीन चार दिवस कोणीही ग्रामस्थ या विहिरी कडे फिरकले नाही असे सरपंच यांनी सांगितले.त्यानंतर विहिरी मध्ये उतरून वनाधिकारी व स्थानीक ग्रामस्थ सर्वश्री दीपक रामचंद्र गोवरे,प्रकाश काशिराम गोवरे,ग्राम पंचायत शिपाई कृष्णा रामचंद्र गोवरे यांच्या सहाय्याने दोरी बांधून विहिरी बाहेर काढले त्यानंतर मृत बिबट्याची पाहणी करता मृत बिबट्या नर असून अंदाजे वय 3 ते 4 वर्षे आहे. त्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची वन अधिकारी यांनी खात्री करुन देवरूख येथे पशुधन विकास अधिकारी श्री.कदम यांचे मार्फत मृत बिबट्याचे शविच्छेदन करून सर्व अवयवासह दहन केले.सदर बिबट्याचा मृत्यु हा भक्षाचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला असावा असे प्राथमिक मत परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांनी व्यक्त केले
सदरची कार्यवाही ही मा.विभागीय वनअधिकारी रत्नागिरी चिपळूण श्री दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक श्री वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार परिमंडळ वनअधिकारी श्री.तौफिक मुल्ला हे करत आहेत
अशाप्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करणेबाबत आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.
प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी.











