बांग्लादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेचे मूक धरणे आंदोलन

रत्नागिरीत आमदार सामंत बंधूंनी हिंदू असल्याचा अभिमान वाटतो, कायम सोबत असल्याचे केले स्पष्ट

रत्नागिरी : बांग्लादेशमधील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध धर्मीयांवर होणाऱ्या अमानुष, क्रूर हल्ल्याविरोधात विश्व हिंदू परिषदेने आज मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला हिंदुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आंदोलनात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि लांजा- राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीही सहभाग घेतला. जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सकाळी १० वाजल्यापासून मूक धरणे आंदोलन सुरू झाले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

मानवाधिकार फक्त शब्द नाही, ते कृतीत आणा, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर होणारे हल्ले थांबवा, ऑल आइज ऑन बांग्लादेश हिंदू, हिंदूंना वाचवायला हवे, संकटात हिंदू, तर मदतीला लाखो हिंदू, जिथे हिंदू सुरक्षित नाहीत, तिथे मानवाधिकार अपयशी आहे, सर्व नजरा बांग्लादेशातील हिंदूंकडे, हिंदूंच्या रक्षणासाठी मैदानात, आमचा पाठिंबा बांग्लादेशी हिंदूंना अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी प्रदर्शित केले होते.

या वेळी उदय सामंत म्हणाले की, आज बांग्लादेश सरकारला पूर्ण महाराष्ट्रातून इशारा देत आहोत. ज्या पद्धतीने इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला, अल्पसंख्यांक हिंदूंवर वाईट पद्धतीने अत्याचार सुरू आहेत, त्याचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषदेतर्फे धरणे आंदोलन होत आहे. आजचे आंदोलन झाले म्हणजे जबाबदारी संपली नाही. तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. ज्याप्रमाणे मोदी सरकार तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर पाकिस्तानने डोळे वटारून पाहण्याची हिंमत केली नाही, तशी स्थिती बांग्लादेशची व्हायला हवी. मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची दयनीय स्थिती केली आहे, तशीच स्थिती बांग्लादेशची व्हायला हवी, असा इशारा महाराष्ट्रातून देत असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केला. असे कोणतेही प्रसंग घडल्यास शिवसेना, सर्व आमदार विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोबत आहेत, असा विश्वास व्यक्त केला.

आज मूक धरणे आंदोलन सुरू आहे. बांग्लादेशातील हिंदु, बौद्धांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आपण रस्त्यावर आलो आहोत. बांग्लादेश विसरला आहे की १९७१ मध्ये भारताच्या केंद्रीय नेतृत्वाने पाकिस्तानपासून त्यांची सुटका केली आहे. पण हे उपकार ते विसरले आहेत. बांग्लादेश स्वतंत्र झाला पण तिथे हिंदू समाजावर अत्याचार होत असतील तर तो देश भारताला जोडता देखील येऊ शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हिंदू आता मार खाणार नाहीत. हे आम्ही आजपर्यंत सिद्ध केले आहे. १९९२ मध्ये अयोध्येचा वादग्रस्त ढाचा जमीनदोस्त केला होता. त्यानंतर जे जे आंदोलन झाले ते हिंदुनी विजयाकडे नेला. रत्नागिरीतही काही वर्षांत हिंदूंची एकता अनुभवली आहे. हिंदुवर आक्रमण झाले तेव्हा सर्व हिंदु एकत्र आले आहेत, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेच्या विवेक वैद्य यांनी केले.

निवेदन देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री विवेक वैद्य, जिल्हामंत्री कुमार जोगळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे यांच्यासमवेत अॅड. रुची महाजनी, सचिन वहाळकर, संग्राम तथा भाई दळी, नंदू चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व जिल्हा, तालुक्याचे पदाधिकारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित व जिल्हा, तालुक्याचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.