इ पीक नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी

 

सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे आमदार नितेश राणेंना निवेदन

त्वरित कार्यवाही करण्याचे आमदार नितेश राणे यांचे आश्वासन

सावंतवाडी । प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या काळात तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नसल्याने शासकीय हमीभावाने भात पीक विक्री करताना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ई पीक नोंदणी तसेच भात पीक विक्री नोंदणीची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली.
सावंतवाडी दौऱ्यावर आलेल्या आमदार नितेश राणे यांच्याकडे या संदर्भातील निवेदन खरेदी विक्री संघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी यासंदर्भात निश्चितच कार्यवाही करून मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न करत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, संचालक गुरूनाथ पेडणेकर, अभिमन्यू लोंढे, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.
निवडणूक काळात ई पीक नोंदणी करण्यात आली तेव्हा तलाठी कार्यालयात सर्व्हरचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच अनेक वेळा निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असल्याने तलाठी उपलब्ध नसत. पाऊसही सुरू होता त्यामुळे ऑनलाईन ई पीक नोंदणी बहुतेक शेतकरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे शासकीय हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता आहे असे चेअरमन प्रमोद गावडे व संचालक यांनी सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, आपण ई पीक नोंदणी मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचे भात पीक हमीभावाने खरेदी व्हावे म्हणून प्रयत्नशील आहे. त्यामुळे ई पीक नोंदणी मुदतवाढ निश्चितच मिळेल मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.