राखडलेली कामे पुढील दोन महिन्यात पूर्ण करा अन्यथा थेट कारवाई करणार – आमदार किरण सामंत

 

लांजा (प्रतिनिधी) ज्या ठिकाणची कामे राखडली आहेत ती पुढील दोन महिन्यात पूर्ण करा अशी तुम्हाला विनंती करीत आहे. मात्र त्यानंतर
विनंती नाही तर थेट कारवाई करण्याचा इशारा आमदार किरण सामंत यांनी ठेकेदार आणि अधिकारी यांना दिला.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत, लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि पाणी टंचाई यासंदर्भात लांजा तालुक्याची आढावा बैठक आज गुरुवार १२ डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संकल्प सिद्धी सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार किरण सामंत बोलत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला सद्यस्थितीत तालुक्यातील विविध गावांतील सुरू असलेल्या कामांबाबतची माहिती कार्यकारी अभियंता जि.प.रत्नागिरी आणि लांजा गट विकास अधिकारी संतोष म्हेत्रे तसेच सरपंच आणि ठेकेदार यांच्याकडून घेतली.

यावेळी आमदार किरण सामंत म्हणाले की, जे जे ठेकेदार हलगर्जीपणा करत आहेत त्यांनी आणि सर्व अधिकारी यांनी ही कामे एक ते दोन महिन्यात पूर्ण करा अशी आज विनंती करतो. परंतु यापुढे विनंती नाही तर थेट कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विकासाची कामे करणे ही माझी जबाबारी आहे, त्यामध्ये पूर्वी प्रमाणे दिरंगाई होताना सहन करनार नाही त्यामूळे जनतेचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत हे लक्षात ठेवून काम करा.

यावेळी लांजा तालुक्यातील गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक व कामकरणारे ठेकेदार यांच्याकडून संबंधित गावातील योजनेच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच अपूर्ण अवस्थेतील कामे सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर आमदार किरण सामंत यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, उप अभियंता शिल्पा करंडे, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ठेकेदार आणि नागरिक उपस्थित होते.