पेंडूर घोडेमुखचा सुपुत्र २५ वर्षं दशावतार क्षेत्रात हार्मोनियम वादक 
सावंतवाडी । सचिन रेडकर : अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे.. त्या मुलांमधील विशेषत्वाची जाणीव करून देण्यासाठी दिलेले एक लक्षण असतं. म्हणूनच कुणी हात नसूनही आपल्या पायाने चित्रे काढतो, तर कुणी आपल्या पायानेच शिल्पाकृती तयार करताना दिसतो. अर्थात यातून त्यांनी आपल्या अपंगत्वावर मातच केलेली दिसते. अशाच प्रकारे आपल्या आवडीला व महत्त्वाकांक्षेला जिद्द आणि परिश्रम यांची जोड दिली की अपंगत्वावर देखील मात करता येते हे आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केलं आहे ते मातोंड पेंडूर घोडेमुख येथील हार्मोनियम वादक शैलेश लाडू सावंत यांनी.
पहाडी आवाज लाभलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील पेंडुर घोडेमुख येथील हार्मोनियम वादक व गायक असलेल्या शैलेश यांचा अपंगावर मात करत भजन ते दशावतार प्रवास अगदी थक्क करणारा आहे. गेली २५ वर्ष दशावतार क्षेत्रात वेगवेगळ्या दशावतार मंडळात हार्मोनियम वादक म्हणून ते भूमिका सांभाळत आहेत.
दशावतार नाटक ही कोकणची परंपरा आहे. कोकण आणि दशावतार हे वेगळच समीकरण आहे. दशावतार हा कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे तसेच श्रद्धेचाही भाग आहे. दशावतार क्षेत्रात जिल्ह्यातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कर्तुत्वाची छाप सोडून नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळेच अशा हौशी कलाकारांमुळेच शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली असून आज साता समुद्रा पार देखील पोहोचली आहे. गावातील जत्रा म्हणजे दशावतारी कलाकारांना आपली कला सादर करण्याचे हक्काचे स्थान. पुर्वी मोजक्याच दशावतारी कंपन्या होत्या, त्या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता बऱ्याच नवीन कंपन्या चालू झाल्या आहेत. त्यामुळे आता दशावतार जास्त लोकाभिमुख होत चालला आहे.
याच दशावतार कलेच्या माध्यमातून नावलौकिक कमावलेले हार्मोनियम वादक म्हणजे शैलेश सावंत. त्यांना अगदी लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचे वडील लाडू श्रीधर सावंत हे सामाजिक नाटकात तबला वादन करत असत.त्यांनी २५ वर्षं सामाजिक नाटकात तबला साथ दिली होती. त्यामुळे संगीताचा वारसा आपणच शैलेश यांच्याकडे आला. त्यांना हार्मोनियम आणि गायन यांची आवड होती.
उजव्या पायाने अपंग असतानाही ते पायपेटी वाजवत असत. भजन क्षेत्रातून त्यांनी आपल्या हार्मोनियम वादन व गायनास सुरुवात केली. घोडेमुख येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळामधून ते भजन करत असत. कै. हरी गवंडे हे त्यांचे भजन क्षेत्रातील गुरु होते.
भजन करता करता दशावतार क्षेत्राकडे हळूहळू त्यांची पावले वळली. रात्री दशावतार नाटकात हार्मोनियम साथ करत दिवसा ते शेती आणि आपला विटांचा व्यवसायही करत आहेत.
थोर दशावतार कलाकार कै. बाबी कलिंगण हे त्यांचे दशावतार क्षेत्रातील पहिले गुरु होते. दशावतारामध्ये पेटी कशी वाजवायची याचे धडे त्यांना बाबी कलिंगण यांच्याकडून मिळाले. बाबी कलिंगण हे दिवसा पेटी उघडून मार्गदर्शन करत व रियाज करून घेत असत. त्यामुळे ते आपल्यासाठी सर्वेसर्वा होते, असे सावंत यांनी सांगितले.
वालावलकर दशावतार नाट्यमंडळात शैलेश सावंत यांनी सलग १० वर्षं हार्मोनियम वादक म्हणून काम केले. वालावलकर दशावतार कंपनीचे मालक नाथा परब यांच्याशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनीही आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले, त्यामुळे आपण एवढा पल्ला पार केला, असेही सावंत यांनी सांगत त्यांचेही आभार मानले.
तसेच ही कला सादर करताना दशावतारातील मोठमोठ्या कलाकारांचे त्यानां वेळोवेळी सहकार्य लाभले. जीजी चोडणकर (गाबीद) व अष्टविनायक दशावतार कंपनीचे मालक बंड्या गोवेकर यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले, या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
सोनुर्ली येथील माऊली दशावतार मंडळापासून त्यांनी आपल्या दशावतारातील हार्मोनियम वादनास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर, वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव, सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ कवठी, अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे आदी मंडळामध्ये त्यांनी हार्मोनियम वादक म्हणून भूमिका सांभाळली. भजनापासूनच त्यांना दशावताराची आवड निर्माण झाली.त्यांचा आवाज पहाडी असल्याने दशावतारामध्ये त्यांना उपयोग झाला. सुरुवातीपासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत त्यांचा आवाज पोहचत असे.
मराठी व हिंदी चित्रपटातील वेगवेगळी गाणी दशावताराच्या ढंगात वाजवायची एक वेगळीच कसब शैलेश सावंत यांच्या अंगात होती. त्यांची हार्मोनियम वर बोटे पडली रे पडली की कलाकाराच्या अंगात एक जोश येत असे. अगदी शेवटपर्यंत आपल्याकडून दशावताराची अशीच सेवा घडावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.












