राजापुरातील जवाहर चौक ते रानतळे रस्त्याची दुरावस्था

 

वाहन चालक व पादचारी त्रस्त

न. प. प्रशासनाला खड्डे भरण्याचा महुर्तच सापडेना

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील जवाहर चौक ते रानतळे या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे. या रस्त्यात धोपेश्वर घाटी ते साखळकरवाडी या परिसरातील रस्त्याची तर पुरती चाळण झाली असून या भागात मोठया प्रमाणावर पडलेल्या खड्यावरून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

या ठिकाणी अपघात देखील होत असून नुकतीच एक महिला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गेले कित्येक दिवस या भागातील खड्डे भरण्याची मागणी करूनही न. प. प्रशासनाला या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी डागजुगी करण्यासाठी अद्याप मुहुर्त सापडलेला नाही.

राजापूर शहराची भौगोलिक रचना ही चढ उताराची असून अनेकदा या प्रतिकुल भौगोलिक रचनेमुळे नागमोडी रस्ते आणि धोकादायक वळणामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याचे उदाहरण म्हणजे जवाहरचौक ते रानतळे रस्ता होय. राजापूर शहरातून नाटे गावखडी रत्नागिरीकडे जाणारा हा जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तिव्र चढ आणि तेवढाच उताराचा हा रस्ता आहे. त्यामुळे या रत्यावरून वाहन चालविताना चालकाला आपले कौशल्य पणाला लावावे लागते. अशातच गेल्या काही दिवसांत या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. जवाहरचौकाकडून मार्गस्थ झाल्यावर खडपेवाडी मारूती नजीकच्या तीव्र चढ रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकाना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तर याच मार्गावर पुढे कोंबेकर घरापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गावर अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

शहरातील महत्वपुर्ण असलेल्या या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालक व पादचाऱ्यांतून करण्यात आली आहे.