मसूरे | झुंजार पेडणेकर : यंदा आंबा पिकास उशिराने मोहोर आला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे, त्याच प्रमाणे सकाळी उशिरापर्यंत धुके पडत आहे गेले. काही दिवस हवामान देखिल अंशत: ढगाळ राहीले आहे. याचा परिणाम म्हणून आंबा पिकावर फुलकीडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.
फुलकीडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशके फारशी प्रभावी आढळून येत नाहीत. त्यासाठी एकात्मिक उपाययोजना करणे फायदेशीर ठरेल. त्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन डॉ. अजय मुंज, कीटकशास्त्रज्ञ आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर- देवगड व मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांचे मार्फत करण्यात येत आहे.
बागेत प्रती झाड ४ ते १० प्रमाणात निळे चिकट सापळे लावावेत.
फुलकीडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी असलेली किटकनाशके उदा. स्पिनोसॅड ४५% फिप्रोनिल ५ टक्के लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के, स्पिनेटोरम ११.७% इत्यादीच्या आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात. तसेच अधून मधून निंबोळी अर्क, करंज अर्क अझाडीरॅक्टींन १०,००० पीपीएम ची फवारणी घ्यावी.
झाडाखालची जमिन उकरून त्यात क्लोरोपायरीफॉस २०% या कीटकनाशकाची भुकटी मिसळावी.
संध्याकाळी बागेत धूर करून त्यात सल्फर पावडर टाकावी.
बागेतील तणांचा बंदोबस्त करून जमिनीवर किटकनाशकांची फवारणी करावी. असे केल्यास जमिनीतील फुलकीडीच्या कोषांचा नायनाट होईल. अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.












