कोत्रेवाडी ग्रामस्थांचा सवाल, लोकांना सोबत घेऊनच फेर तपासणी करण्याची मागणी
लांजा (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फेर तपासणी अधिकारी तथा राजापूर तहसीलदार यांनी कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड (क्षेपणभूमी) प्रकल्प जागेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अपेक्षित असताना एक केवळ लांबूनच नजर पाहणी करण्यात आल्याने फेर तपासणी करण्याचा शासनाकडून केवळ दिखावा केला जात आहे का? असा सवाल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे .
दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनुसार डम्पिंग ग्राउंड च्या जागेची फेर तपासणी ही ग्रामस्थांना सोबत घेऊनच करावी, अन्यथा या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा कोत्रेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे .
कोत्रेवाडी येथे वस्तीलगत लांजा नगरपंचायतीमार्फत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे .या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही शासनाचा अधिकृत रस्ता नाही. जलस्रोत जवळ आहेत .आणि विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पाची जागा ही शासनाच्या २०१६ च्या निकषात बसत नाही अशा आशयाचे पत्र देखील दिलेले आहे .असे असतानाही लांजा नगरपंचायतीकडून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अगोदर ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली होती. या बैठकीनंतर जिल्हा सह आयुक्त, रत्नागिरी तुषार बाबर यांनी या प्रकल्पाच्या जागेची फेरतपासणी करण्याचे पत्र राजापूर तहसीलदार यांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार यांची भेट घेतली. सदर प्रकल्प हा आमच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही शासकीय अधिकृत रस्ता नाही.जलस्त्रोत जवळ आहेत. त्याचप्रमाणे सदर संपूर्ण जागेची भूमि अभिलेख कार्याकडून मोजणी करण्यात आलेले नाही .हद्दी खुणा दाखवण्यात आलेल्या नाहीत. आदी बाबी ग्रामस्थांनी तहसिलदार विकास गंबरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
मात्र राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी सांगितले की मी गुरुवारी सायंकाळी या जागेचे पाहणी केली आहे. मात्र यावेळी ग्रामस्थांनी आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे का असा सवाल केला. मात्र आपण दुरून ही पाहणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले .
दरम्यान ग्रामस्थांच्या आग्रही मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तहसीलदार यांनी पुन्हा एकदा फेरतपासणी करावी. यासाठी याचिकाकर्त्या सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊनच या जागेची प्रत्यक्ष फेरतपासणी करावी अशी मागणी करण्यात आली मात्र आपणास शक्य झाले तरच आपण जावू असे त्यांनी सांगितले .
अशाप्रकारे डंपिंग ग्राउंडच्या जागेची
फेरतपासणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन न करताच दुरूनच त्याची जर पाहणी केली जात असेल तर शासनाकडून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी राज्य निवडणूक निरीक्षक पोलीस राजेंद्र प्रसाद मिना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी या प्रकल्पाच्या जागेची ग्रामस्थांसोबत स्थळ पाहणी करून ग्रामस्थांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे जिल्हा निवड समितीने २०२१ मध्ये कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड जागेची पाहणी करून सदर जागा अयोग्य असल्याचे दिलेले पत्र देखील ग्रामस्थांनी तहसिलदार यांना दाखवले असता ते त्यांनी न स्वीकारल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
अशाप्रकारे जर ग्रामस्थांच्या मागणीनुसार जर योग्य प्रकारे तपासणी किंवा चौकशी केली जात नसेल तर या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोत्रेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.











