अभिनेते प्रशांत दामले यांची सावंतवाडीतील वेदशास्त्र पाठशाळेला भेट

संस्थेच्या कामकाजाची जाणून घेतली माहीती

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने सावंतवाडी दौऱ्यावर आलेल्या नाट्यसृष्टीतील विक्रमादित्य अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी प्रयोगापूर्वी सावंतवाडीतील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पाठशाळेतील वैदिक आणि याज्ञिक शिक्षणाची माहिती जाणून घेतली. पाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती भूषण केळकर गुरुजी यांनी त्यांना संस्थेच्या कामकाजाची माहीती दिली.

 

सावंतवाडीतील नाट्यचळवळीबाबत देखील उपस्थितांनी त्यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीत सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहातील अपुऱ्या सुविधा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या ज्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान घेतला .
प्रचंड लोकप्रियता मिळवलेला विक्रमवीर नाट्यअभिनेता आणि एक यशस्वी नाट्यनिर्माता असून देखील अगदी आपुलकीने आपलेपणाने त्यांनी चर्चा केली.
केवळ रंगमंचावरच नव्हे तर रंगमंचाबाहेरही प्रचंड उर्जा असलेल्या प्रशांत दामले यांच्यासह घालवलेला वेळ नाट्यकर्मीसाठी प्रेरणा देणारा होता. पाठशाळेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत वावदे यांच्यामुळेच ही भेट घडून आली.
यावेळी पाठशाळेचे कार्यवाह शिवानंद भिडे, बाळ पुराणीक, खजिनदार गणेश दीक्षित, श्रीकांत वावदे , वेदमूर्ती श्री केळकर गुरुजी, तेजस प्रभुदेसाई, कु. आर्य पुराणिक तसेच पाठशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.