ज्येष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र विभाग
राजापूर | प्रतिनिधी : सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक म्हणून ओळख असलेल्या राजापूर अर्बन को. ऑप. बँकेच्या बाराव्या आणि रत्नागिरी जिल्हयातील आठव्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी शाखेचा शुभारंभ रविवार 21 मे रोजी होत आहे. दक्षिण रत्नागिरीतील राजापूर, लांजा, रत्नागिरीनंतर आता उत्तर रत्नागिरीतील गुहागर बँकेचे मुख्य कार्यकारी शेखरकुमार अहिरेगुहागर वासीयांच्या सेवेत उतरताना त्यांना अत्याधुनिक चांगली दर्जेदार सेवा देतानाच ज्येष्ठ नागरीकांच्या सेवेसाठी या ठिकाणी बँकेचा स्वतंत्र विभाग कार्यरत असेल अशी माहिती बँकेचे बँकेचे मुख्य कार्यकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या गुहागर शृंगारतळी येथील बाराव्या शाखेच्या शुभारंभाबात दैनिक प्रहाराशी बोलताना अहिरे यांनी याबाबत माहीती दिली., राजापूर अर्बन बँकेने आपले कार्यक्षेत्र राज्यभर पसरण्याचा संकल्प सोडलेला आहे. तर पुढील काही वर्षात राजापूर अर्बन बँकेचे शेडयुल बँकेत रूपांतर होणार आहे. अत्याधुनिक सेवेची कास धरताना बँकेने ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देण्याचा घेतलेला वसा कायम जपला असून प्रत्येक शाखेत त्याची प्रचिती ग्राहकांना येते. तीच सेवेची प्रचिती गुहागर वासीयांनाही येईल असेही अहिरे यांनी सांगितले.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रविवारी 21 मे रोजी सुरू होत असलेली ही शाखा बँकेची बारावी शाखा आहे, तर रत्नागिरी जिल्हयातील आठवी शाखा असल्याचे अहिरे यांनी सांगितले, राजापूर, साखरीनाटे, पाचल, लांजा, रत्नागिरी, देवरूख, जानशीपठार या सात शाखा जिल्ह्यात कार्यरत असून आता शृंगारतळी ही आठवी शाखा रत्नागिरी जिल्हयात सुरू होत आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हयात नव्याने सुरू झालेल्या तळेरे शाखेसह वैभववाडी, कुडाळ व पडेल अशा चार शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांच्या माध्यमातुन ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा देण्याचे काम केले जात असल्याचे अहिरे यांनी सांगितले. तर शाखा तेथे एटीएम या धोरणाप्रमाणे शृंगारतळी शाखेच्या शुभारंभ प्रसंगी तेथील एटीएमचाही शुभारंभ होणार आहे. त्यामुळे बँकेचे हे 14 वे एटीएम असणार असल्याचेही अहिरे यांनी सांगितले.
शृंगारतळी शाखेच्या माध्यमातुन तेथील सर्वसामान्य सभासद, व्यापारी, छोटे व्यावसायिक, गृहउद्योग, महिला, छोटे मोठे वाहन चालक यांना बँकेकडून आवश्यक तो कर्जपुरवठा केला जाईल, ठेवीदारांनाही त्यांच्या ठेवीवर योग्य व्याजदर देताना जास्तीत जास्त ठेवी बँक जमा करेल. तर ज्येष्ठ नागरीकांसाठी बँकेत स्वतंत्र विभाग असेल व या विभागातुन ज्येष्ठ नागरीकांना सेवा दिली जाईल. प्रसंगी घरपोच सेवाही ज्येष्ठ नागरीकांना दिली जाईल असेही अहिरे यांनी सांगितले. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कामकाज अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरू असून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हयात आणखी एक नवीन शाखा प्रस्तावित करतानाच राजापूर तालुक्यात भू, सागवे, हातिवले, सौंदळ या ठिकाणी बँकेचे मिनी काऊंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही अहिरे यांनी सांगितले.
रविवार दि. 21 मे रोजी सकाळी 11 वाजता बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळयाला प्रमुख अतिथी म्हणून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार आहेत.
शृंगारतळी येथील समर्थ भवन, पहिला मजला, पोस्ट ऑफिसजवळ, बाजारपेठ शृंगारतळी येथे ही बँकेची नवी शाखा सुरू होत आहे.
त्यानिमित्त श्रीसत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली असून या शाखा शुभारंभ कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थीत राहण्याचे आवाहनही शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.