चिपळूणमधील प्रत्येक ग्रामपंचायतीनी पावसाळ्यात किमान ५०० झाडे लावावीत- आ. शेखर निकम

टंचाई आराखडा बैठकीत आवाहन

चिपळूण (प्रतिनिधी) ः तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी येत्या पावसाळ्यात किमान ५०० झाडांची लागवड करावी. झाडे जगण्यासाठी गावस्तरावर प्रयत्न करावेत. केवळ कागदोपत्री ही मोहिम राबवू नये. यात अनेक अडचणी येतील. मात्र त्यावर मार्ग काढून पुढे जाण्याची भूमिका सर्वानी स्विकारायला हवी. सर्वाधिक झाडे लावून त्यांचे जतन करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मान केला जाईल, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना टंचाई आराखडा बैठकीत केले.

चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई कृती आराखडा बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई विषयाची माहिती दिली. तर पाणी योजनांच्या कामात विहीरी, साठवण टाकी, बोअरवेल आदीसाठी लोकांच्या मोफत जमिनी घेताना येणाऱ्या समस्यांची माहिती दिली. त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. ज्या गावात पाण्याची अडचण आहे. विहीरी, बोअरवेलची आवश्यकता आह, अशा ग्रामपंचायतींनी तातडीने प्रस्ताव पंचायत समितीत द्यावेत. गतवर्षी काही ग्रामपंचायतींनी परिपुर्ण प्रस्ताव दिले नाहीत, परिणामी त्यांची कामे मंजूर झाली नसल्याचे आमदारांनी सांगितले.

या बैठकीच्या निमित्ताने आमदार निकम यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती समोर वृक्ष लागवडीचा विधायक उपक्रम मांडला. ते म्हणाले, येत्या पावसाळ्यात सर्व ग्रामपंचायतींनी किमान ५०० झाडे लावण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आतापासूनच तयारी करावी. वृक्ष लागवडीसाठी देशी रोपांची निवड करावी. अनेक गावाात शासकीय जागा पडीक आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागेत रोपांची लागवड करावी. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम केवळ फोटोसेशन पुरता मर्यादीत राहू नये. गतवर्षी लावलेली झाडे किती जगली, याचाही मागोवा घ्यावा.

मोकाट गुरांमुळे झाडांना खिळ बसत असल्याचे काही सरपंचानी नमुद केले. त्यावर आमदार निकम म्हणाले, योग्यरित्या वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्यासाठी अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करून पुढे जाण्याची भूमिका स्विकारायला हवी. गुरांपासून रोपांचे संगोपान होण्यासाठी बांबूपासून ट्री गार्ड तयार करावे, हे काम कमी खर्चात होईल. एखाद्याच्या वाढदिवसानिमीत्त ५ ते १० ट्री गार्ड भेट स्वरूपात घ्यावेत. अडचणी या येत राहणार आहेतच, त्यावर मात करायला हवी. पावसाळ्यात लागवड होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. याकामी संस्था, मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सामावून घ्यावी. जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करावे. वृक्ष लागवडीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. हे श्री सदस्य नियमीतपणे झाडे लावून त्यांची जोपासन करत आहेत.

यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी सौ. उमा घार्गे पाटील, पाणी पुरवठा उपअभियंता प्रतिक झिंगे, शाखा अभियंता दिपक गवस, महावितरणचे श्री. पाटणकर, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे रविंद्र जाधव यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.