मंडणगड | प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे निमीत्ताने 19 फेब्रुवारी 2025 रोजी शहारातील विविध संस्थाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग मंडणगड यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र्यावर आधारीत आयोजीत करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, बुध्दीबळ स्पर्धा, वेशभुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. शिवरुद्र अँकेडमी श्रीवर्धन यांच्या खेळाडूंनी मल्लखांब व दोरीवर खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन तालुकावासीयांची मने जिंकली. यावेळी शिवकालीन शस्त्रांची माहीती व प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजंयत्तीनिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने शिवपालखीचे भिंगळोली ते मंडणगड परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मंडणगड बसस्थानकाचे परिसरात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लेझीम या खेळांची प्रात्यक्षीके सादर केली. ढोल ताशा व घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, अर्जुन हुल्लोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, संतोष मांढरे, यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
मराठा समाज कर्मचारी संघटनेच्यावतीने शहरातून भव्य रँली काढण्यात आली.
राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्यावतीने रायगड ते मंडणगड शिवज्योत यात्रा काढण्यात आली. रायगडावरुन आलेल्या मावळ्याचे प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी शहरात भव्य स्वागत केले यानंतर , महिलांची बाईक रँली काढण्यात आली. सायंकाळी शिवपालखी मिरवणुक, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांसाठी लकी ड्रॉ कुपन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजे प्रतिष्ठानने आयोजीत केलेले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष योगेश जाधव यांच्या नियोजनाखाली सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.











