कंत्राटी शिक्षक सेवा पुर्ववत सुरू ठेवण्याबाबत आपले स्थरावर सहकार्य मिळण्याबाबत …

डि.एड बी.एड बेरोजगार संघटना शाखा गुहागरच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांना निवेदन

मोडकाआगर | वार्ताहर : कंत्राटी शिक्षक भरती बंद शासन निर्णयाचा पुनर्विचार करून कंत्राटी शिक्षकांची सेवा समाप्त न करता लागु झालेल्या शासन निर्णयाप्रमाणेच कंत्राटी शिक्षक सेवा पुर्ववत सुरू ठेवण्याबाबत आपले स्थरावर सहकार्य मिळण्याबाबत
डि.एड बी.एड बेरोजगार संघटना शाखा गुहागरच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरचे वतीने तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना निवेदन देण्यात आले. मनसे तालुका संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे डि.एड बी.एड बेरोजगार संघटना शाखा गुहागरच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमोद गांधी यांनी सांगितले येथे डि.एड बी.एड बेरोजगार संघटनेने दिलेले निवेदन या विषयासंदर्भात नक्कीच सर्व शिक्षकांना मनसेकडून पाठिंबा राहील तसेच सर्व शिक्षकांना कायमस्वरूपी रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आमचा नक्कीच प्रयत्न असेल सन्माननीय पक्ष अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्याकडे या विषयासंदर्भात चर्चा केली जाईल. त्याचप्रमाणे या संदर्भात चर्चा करण्यासाठी संघटनेतील पदाधिकारी यांची राज ठाकरे साहेबांशी भेट घडवून देण्यात येईल.

 

राज साहेब नक्कीच या विषयावर मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याशी बोलून कायमस्वरूपी तोडगा काढतील असा विश्वास सर्व समितीतील पदाधिकाऱ्याना दिला. यावेळी सुमित मुंडेकर, समीर कुंभार ,रोहित पटेकर, विप्रा पावस्कर, विभा गमरे, शुभांगी निंभोरे ,सुनीती जांभारकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यात एकुण ४० कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या ऑक्टोबर/जानेवारी या कालावधी दरम्यान करण्यात आल्या होत्या.गावातील स्थानीक बी.एड, डि.एड पात्र बेरोजगार असणारा शिक्षक हा स्थानीक कंत्राटी शिक्षक म्हणुन आपल्या गावातील शाळेत प्रामाणीकपणे, नियमीतपणे विद्यादानाचे पवित्र कार्य करित आहे त्यामुळे निश्चितपणे गावातील विद्यार्थ्यांना आपल्या भाषेत बोलणारे तसेच आपुलकीने शिकविणारा शिक्षक प्रिय वाटत आहे. त्याच पद्धतीने आपल्याही निदर्शनास आले असेल की, या स्थानीक शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे शिक्षणाच्या दर्जात वाढ झाली आहे. तसेच अनेक पालकांनीही आपल्या पाल्याचे अभ्यासकार्य सुधारले असल्याचे तोंडी दाखल देवुन शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीला दाद देवुन शिक्षकांना प्रेरणा दिली आहे.परंतु शासन निर्णय नुसार नियुक्ती असलेले कंत्राटी शिक्षक यांना कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरून काढुन टाकणे / शाळावरून कमी करण्यासंदर्भात कार्यवाही एप्रिल २०२५ पासुन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा शाळांमध्ये शिक्षक असणे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु शकते. राज्य शासनाने १० फेब्रुवारी रोजी कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम डोंगराळ भागात वसलेला आहे.

 

त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा अतिशय डोंगर कपारीत आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या सोयी देखील नाहीत. गावात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब शहरकडे स्थलांतरित झाली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा पट कमी झाला आहे. जिल्ह्यात ५०० हून अधिक शाळा दहा पेक्षा कमी पट असलेल्या आहेत. अनेक शाळा पोर्टल शिक्षक भरती होऊनही शून्य शिक्षकी आहेत. पवित्र पोर्टल हे कोकणासाठी कायम अपवित्र झाले आहे. एका विशिष्ट जिल्ह्यातील पवित्र पोर्टलला जास्त शिक्षक भरती होतात तर एका भागातील फार कमी शिक्षक भरती होतात. हा संशोधनाचा विषय बनला आहे.
कोकणातील शाळा या बंद करण्याचा अंतर्गत प्रयत्न केला जातोय. वाडी वस्तीतील कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस दिसत आहे. कोकणातील लहान लहान अतिदुर्गम भागात शिकणाऱ्या मुलांना याचा फटका बसणार आहे.. गरिबांची मुलं यात भरडली जाणार आहेत.या सर्व बाबींचा विचार करून कोकणचे सुपुत्र माजी शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर साहेब यांनी युती सरकार असतानाच १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत एक कंत्राटी शिक्षक देण्याचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२४ ला घेतला होता.

 

पुन्हा एकदा युती सरकार असतानाच नवीन शिक्षण मंत्री महोदय यांनी कोकणातील जागा इतर जिल्ह्यातील शिक्षकांना मिळणार नाहीत. सर्व कोकणातील स्थानिक शिक्षक लागतील त्यामुळे हे सर्व होऊ नये या हेतूने १० फेब्रुवारी २०२५ ला कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४९५ शिक्षकांना कंत्राटी तत्वावर जिल्हा परिषदेने नियुक्ती दिली होती कंत्राटी शासन निर्णय रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शिक्षकांची नियुक्ती धोक्यात आली आहे याचा गांभीर्याने विचार करून या शिक्षकांना सेवेत कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही विनंती.मार्च २०२४ चा संचमान्यातेचा शासन निर्णयाची अंमलबाजणी झाल्यास ग्रामीण भागातील शाळांना एकच शिक्षक मिळणार आहे. यात कोकणचे म्हणजेच जास्त नुकसान रत्नागिरी जिल्ह्याचे होणार आहे. रत्नागिरी जिल्हा भरती केंद्र बनले आहे २०२३ मध्ये जवळपास साडेसातशे शिक्षक जिल्हा बदलीने गेले. शाळा उघडायला शिक्षक नव्हते.. स्थानिक कंत्राटी सातशे शिक्षक नियुक्त केले त्यामुळे शिक्षण विभाग सावरला… जवळपास पंधराशे शिक्षक पोर्टल भरतीने जून २०२४ ला मिळाले आणि सर्व कंत्राटी शिक्षकांना काढून टाकले… पुन्हा सप्टेंबर २०२४ ला साडेतीनशे शिक्षक जिल्हा बदली करून गेले.. अनेक शाळा शून्य शिक्षकी झाल्या. त्यामुळे पुन्हा ५०० कंत्राटी शिक्षक घेतले.. आता पुन्हा पवित्र पोर्टल भरती सुरु आहे.. कंत्राटी शिक्षकांवर टांगती तलवार आहे.. सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि कंत्राटी शिक्षक भरती सुरु ठेवावी. नियुक्ती केलेल्या कंत्राटी शिक्षकांना कमी करण्यात येऊ नये.