वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगर परिषदेची शक्कल, अतिक्रमणातून मुक्त जागांचा वापर
चिपळूण (प्रतिनिधी):– अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जागा आता वाहनतळ बनल्या आहेत. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नगर परिषदेने ही शक्कल लढवली आहे. त्याचा चांगला फायदा होणार आहे. ठिकठिकाणी वाहनतळांचे फलकही लावण्यात आले आहेत.
शहरातील मोठे अतिक्रमण, पार्किंगच्या जागांवरही केलेला कब्जा यामुळे कायमच बाहतूककोंडी दिसून येते. आम्हाला चाहने लावण्याची व्यवस्थाच नाही’ असे म्हणत दुचाकी ये चारचाकी वाहन चालक मनाला वाटेल तेथे रस्त्यातच वाहने उभी करतात. यातूनच शहरातील बसस्थानक चालकांनी वाहनतळ केले असल्याने गुहागर मार्गावर धावणाऱ्या बसेस मुख्य रस्त्यावरच उभ्या केल्या जात आहेत. मात्र, याकडे एसटी आगार प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. असे असतानाच काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला आहे. त्यामुळे कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, भाजी मंडईसह अनेक परिसर मोकळे झाले आहेत. त्यामुळे आता मोकळे झालेले भाग वाहनतळ करण्यात आले आहेत. तसे फलक येथे लावण्यात आले असून वाहनचालक त्यांचा वापरही करू लागले आहेत. त्यामुळे अतिक्रमणमुक्त जागांचा असाही चांगला उपयोग प्रशासन करताना दिसत आहे.
शहरातील वाहनतळ हे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत त्यामुळे येथे किती वेळ वाहने उभी करावीत. याचा नियम असणे गरजेचे आहे. अन्यथा जागा मोकळ्या आहेत म्हणून वडापचा व्यवसाय करणारे वाहनधारकही याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तेही अतिक्रमणच ठरणार आहे.
चौकट
नागरिकांना फायदा होईल
भाजी मंडई खेडेकर क्रीडा संकुल येथे पूर्वीपासूनच वाहनतळ आहेत. मात्र अतिक्रमणामुळे त्यांचा उपयोग होत नव्हता. मात्र आता ती जागा मोकळी झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी योग्य पद्धतीने यथे वाहने पार्किंग केल्यास फायदा होणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले.











