कुशिवडे शिगवणवाडी मराठी शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

शाळेच्या शीरपेचात मानाचा तुरा.

ग्रामस्थांमधून मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक

चिपळूण (प्रतिनिधी):– तालुक्यातील कुशिवडे शिगवणवाडी नं. २ मराठी शाळेला रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. तत्पूर्वी या शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा देखील पुरस्कार मिळवला आहे. या शाळेच्या यशस्वी कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेले कुशिवडे हे एक खेडेगाव आहे. या छोट्याशा खेडेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुशिवडे शिगवणवाडी नं.2 ही 1 ली ते 4 थी पर्यंतची शाळा आहे.शाळेत एकुण 20 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. बहुतांशी पालक हे रोजंदारीवर मोलमजुरीचे काम करणारे आहेत. श्रमजीवी आणि कष्टकरी वर्गातील पालक आणि समर्पक भावनेने काम करणारे गुरूजन यांच्या उत्तम समन्वयामुळे आणि प्रशासकीय अधिका-यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे या छोट्याशा शाळेने एक नवा आदर्श सर्वांपुढे उभा केला आहे.

मोलमजुरी करणा-या पालकांनी स्वतः पदरमोड करून शाळेला सढळ हस्ते देणगी दिली. मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उठाव केला. त्यामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक गरजा पुर्ण करणे शक्य झाले.विविध सुविधा निर्माण करताना पालक वर्गाने श्रमदानदेखील मोठ्या प्रमाणात केले.शाळेतील प्रत्येक उपक्रमांत सहभागी होऊन विद्यार्थी व शिक्षकांसमवेत शैक्षणिक वातावरण निर्मिती केली.

माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायलाच हवे यासाठी शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले. म्हणूनच एका छोट्याशा खेडेगावातील या शाळेने एवढी मोठी उंची गाठली आहे.

त्यासाठी चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा.श्रीम. उमा घारगे पाटील , गटशिक्षणअधिकारी दादासाहेब इरनक, शिक्षण विस्तार अधिकारी राजअहमद देसाई ,बमाजी केंद्रीय प्रमुख मा. सुभाष भुवड , केंद्रीय प्रमुख मा.विजय कवितके या अधिकारी वर्गांनी वेळोवेळी अचुक मार्गदर्शन करून शिक्षकांमध्ये उर्जा निर्माण केली.

शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शिवडे तसेच सतिश सावर्डेकर यांनी अतिशय मेहनत घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ , माता पालक संघ यांच्या सहकार्याने शाळेला ख-या अर्थाने आदर्श केले आहे.

सन 2023/24 या शैक्षणिक वर्षांत शाळेचा सुवर्ण महोत्सव महोत्सव संपन्न करताना पुणे – मुंबई स्थित असणारे शाळेचे माजी विद्यार्थी,तसेच मित्रपरिवार, यांनी सढळ हस्ते मदत केली.त्यावेळी विद्यमान आमदार शेखर निकम यांनी यांचे शाळेचे कौतुक करून हातभार लावणा-या सर्वांचे अभिनंदन देखील केले.

या शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन किर्तीकिरण पुजार यांनी आकस्मित भेट देऊन शाळेचे मुक्तकंठाने स्तुती करीत शाळेचा गौरव केला होता.

शिक्षणाबरोबरच शाळेत कला ,क्रीडा,शासनाच्या विविध योजना ,आनंददायी शिक्षण,परसबाग,या साठी विविध उपक्रम राबविले जातात. शाळेच्या यशस्वी वाटचालीत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांचे पाठबळदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. शाळेमध्ये या पुर्वी शिक्षक म्हणून काम करणा-या माजी शिक्षकांनी देखील या शाळेच्या उन्नतीसाठी महत्वाचे योगदान दिले असल्याचे पालक वर्ग आवर्जून सांगतात..
ज्ञानार्जनासाठी शाळेत यावे आणि सेवेसाठी बाहेर जावे
या ब्रीद वाक्याला अनुसरून शाळेची घोडदौड अविरतपणे सुरू असल्याने
या शाळेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

चौकट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला त्याचा आनंद नक्कीच आम्हा सर्वांना आहे . शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त निमित्त जवळजवळ 7 ते 8 लाखाचा वस्तुरूप शैक्षणिक उठाव करण्यात आला.आणि या शैक्षणिक उठावातून शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधा पूर्ण करण्यात आल्या. पालक आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदान आणि मित्रपरिवार तसेच शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून मिळालेले आर्थिक सहकार्य आणि यातूनच शाळेचा कायापालट झाला असून सर्वांचे मनापासून या निमित्ताने आभार व्यक्त करतो. सर्व सन्माननीय जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गांना मनापासून धन्यवाद देतो!

सतीश सावर्डेकर
उपशिक्षक:- जिल्हा परिषद शाळा, कुशिवडे -शिगवण वाडी