राजापुरची सुकन्या समृध्दी नार्वेकर झाली न्यायाधिश

कठोर मेहनत घेत मिळविले यश

अभिनंदनाचा होतोय वर्षाव

राजापूर (प्रतिनिधी): कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य करता येते हे राजापुरातील समृध्दी प्रशांत नार्वेकर या युवतीने आपल्या कृतीतून सिध्द करून दाखविले आहे. समृध्दी हिने दुर्दम्य इच्छा शक्तीला कठोर परिश्रमाची जोड देत आपले निश्चित केलेले ध्येय गाठले आहे. तीने बारावी नंतर कोल्हापूरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षे बॅचरल ऑफ सोशल लॉ (B.S.L.L.L.B.) चे शिक्षण घेऊन पुढे दोन वर्षात दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राजापुर तालुक्यात अशा प्रकारे न्यायाधिश होणारी ती पहिली न्यायाधिश ठरली आहे.

या परिक्षेसाठी बसलेल्या ११४ विद्यार्थ्यांमध्ये समृध्दी हिने राज्यात तीसावा आणि इंटरव्यू मध्ये ५० पैकी ३५ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. राजापुरातील प्रसिध्द सुवर्णकार असलेल्या प्रशांत व सौ. प्रेरणा नार्वेकर यांची समृध्दी ही सुकन्या असून तीच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

समृध्दी हीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजापुरात झाले. राजापुरातील नॅशनल इंग्लीश स्कुल मधून ती दहावी झाली. त्यानंतर ती नवजीवन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राजापुर येथून बारावी परिक्षा उतीर्ण झाली.

त्यानंतर तीने कोल्हापूरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षे बॅचरल ऑफ सोशल लॉ (BSL LLB) साठी प्रवेश घेतला. या ठिकाणी पाच वर्षे शिक्षण घेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परिक्षेसाठी तयारी करत परिक्षा दिली होती. या कालावधित तीने राजापुरातील प्रसिध्द विधिज्ञ एड. मिलिंद चव्हाण यांच्याकडे क्रिमनल केस साठी प्रॅक्टीसही केली. प्रारंभी प्री प्रिलियम त्यानंतर मेन्स व त्यानंतर इंटरव्यू अशा प्रकारे परिक्षा दिल्या होत्या.

शनिवारी सायंकाळी तिने दिलेल्या दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षेचा निकाल जाहिर झाला. यात समृध्दी हिने बाजी मारली आहे. तीने इंटरव्यूमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात ती तिसावी आली आहे. समृध्दी हिची आजी म्हणजे आईची आई श्रध्दा रांगणेकर या न्यायाधिश होत्या. त्या जिल्हा न्यायाधिश पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांची प्रेरणा घेत आपण याच क्षेत्रात करिअर करायचे असे प्रारंभी पासूनच निश्चित केले होते असे समृध्दी हिने सांगितले. यासाठी आजीचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तीन नमुद केले.

आपल्या या यशात आपली आजी श्रध्दा रांगणेकर, प्रगती नार्वेकर, वडिल प्रशांत, आई प्रेरणा, भाऊ सामर्थ्य यांसह गुरूजनांचा मोठा वाटा आणि भक्कम पाठबळ असल्याचे तीने सांगितले.

समृध्दी ही दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परिक्षेत राज्यात तिसाव्या क्रमांकाने उतीर्ण झाल्याबद्दल तीचे राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरिक्षक सुधीर उबाळे, पोलीस कर्मचारी सचिन विर, अनिल केसकर यांसह काका गणेश नार्वेकर, सौ. तनिष्का नार्वेकर, राजापूर शिवसेनेचे शहर अध्यक्ष सौरभ खडपे यांसह अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.

या परिक्षेच्या निकालाची माहिती मिळताच रविवारी सकाळी समृध्दी हिने जवाहर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तिन वर्षे सोशल मिडियापासून दूर

आपण प्रारंभीपासूनच आपल्याला आपण निश्चित केलेले न्यायाधिश बनन्याचे ध्येय आपल्याला गाठायचे आहे हे ठरविले होते. त्यासाठी मनापासून कठोर परिश्रम घेण्याचीही तयारी ठेवली होती व घेतले. लॉच्या शेवटच्या वर्षात असताना व या परिक्षेची तयारी करत असताना ही तीन वर्षे पुर्णपणे मी माझा मोबाईल बंद ठेवला होता. केवळ आईवडिलांना दिवसातुन एकदा फोन कॉल करण्यासाठी सुरू करायचा त्यानंतर बंद करायचा. या तीन वर्षात आपले केवळ अभ्यास करून ध्येय गाठण्याची परिश्रम करणे हा एकच ध्यास होता. त्यामुळे पुर्णपणे सोशल मिडियापासून तीन वर्षे लांब होते असे समृध्दी हिने सांगितले.

कु. समृध्दी हिने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.