सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी फणसवडे गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या कार्यक्रमात, फणसवडे गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांचे श्री देव मल्लनाथ मंदिरात स्वागत केले आणि त्यांचा नागरी सत्कार केला. गावाच्या नावातच फणस असल्यामुळे, त्यांना फणसाचे फळ भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षकांनी गावातील लोकांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ११२ या डायल क्रमांकाबद्दल माहिती दिली आणि पोलीस दलातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. गावातील ज्येष्ठ नागरिक भास्कर गावडे यांनी पोलीस अधीक्षकांना गावाच्या व्यसनमुक्त परंपरेबद्दल माहिती दिली. फणसवडे गाव अनेक पिढ्यांपासून व्यसनमुक्त असून, गावातील एकही व्यक्ती व्यसन करत नाही, हे ऐकून पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी गावाचे कौतुक केले. या गावातील लोकांना व्यसनमुक्तीसाठी ब्रँड अँबेसिडर बनवणे गरजेचे आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमात, भाजप कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी गावाच्या विकासाबाबत माहिती दिली. तसेच, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका आयपीएस अधिकाऱ्याने फणसवडे गावाला भेट दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी शाळेतील मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. गावातील नैसर्गिक सौंदर्य पाहून त्यांनी मंदिरासमोरील पारंपरिक लाकडी बाजेवर बसून चहा घेतला.
गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि नैसर्गिकपणा जपल्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. गावकऱ्यांनी फणसवडे गाव सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत समाविष्ट करण्याची मागणी केली. सध्या हे गाव बांदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असल्यामुळे, शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी ग्रामस्थांना मोठा प्रवास करावा लागतो. यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांना दिले.
या कार्यक्रमाला बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, महसूल आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी, तसेच फणसवडे गावातील महिला, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










