संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरीलसंगमेश्वर निढळेवाडी येथे जीप आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवाशांपैकी ११ जण जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. हा अपघात निढळेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी ८ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास झाला.
या अपघातात जीपमधील जुलेखा आलिमियाँ तांडेल (वय ५०), बेबीनाज अल्लाउद्दीन मुकादम (६०), हसीना लियाकत कोतवडेकर (५०), राबिया आलिमियाँ राजपूरकर (५०, सर्व रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), सुमोचालक शिशिर शांताराम सावंत (५०, कीर्तीनगर रत्नागिरी); तर मोटारीतील दीपक पंढरी आर्से (२३, चालक), योगेश उमाकांत गरदे (४८), लता उमाकांत गरदे (६९), मुदिता योगेश गरदे (४२), उमाकांत रामचंद्र गरदे (७८), आराध्या योगेश गरदे (११, सर्व रा. भरगोंन, मध्य प्रदेश) जखमी झाले आहेत.
यातील काहींना किरकोळ दुखापत, तर काहींना गंभीर दुखापत व रक्तस्राव झाला. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजित मोरे यांनी या सर्वांवर प्राथमिक उपचार केले. शिशिर शांताराम सावंत (४९, रा. कीर्तीनगर) हे त्यांच्या मालकीच्या असलेल्या जीपने रत्नागिरी येथून चिपळूण तालुक्यात येणाऱ्या वहाळ येथे भरणाऱ्या आठवडा बाजारात मच्छी विकणाऱ्या रत्नागिरी मिरकरवाडा येथील महिलांना घेऊन गेले होते. संध्याकाळी बाजार आटपल्यावर महिलांना घेऊन रत्नागिरी येथे परतत असताना संगमेश्वर एसटी स्टॅन्डपासून सुमारे दोन कि.मी. अंतरावर असलेल्या निढळेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर आले असता, गोव्याच्या दिशेहून सुसाट वेगात येणाऱ्या मोटारीने जीपला जोरदार धडक दिली. चालक दीपक पंढरी आर्से (२३, रा. भरगोंन) कार चालवत होता. मोटारीच्या जोरदार धडकेने जीप कोलांटी खाऊन रस्त्यावर उभी राहिली. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना घडल्यावर स्थानिक तसेच वाहनचालकांनी पुढे होत दोन्ही वाहनांतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत सुरू केली. पथकसुद्धा हजर झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अपघातातील दोन्ही गाड्या बाजूला करून वाहतूक कोंडी सोडवली. या मार्गांवरून जाणारे रत्नागिरी मुरूगवाडा येथील प्रकाश रामचंद्र गुरव यांच्या मोटारीने आणि संगमेश्वर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.











