‘शब्दांत त्यांनी रचला न्याय,
विचारांनी उभा केला पाया!
बाबासाहेबांचं स्वप्न असावं,
प्रत्येक हृदयात संविधान जपावं!’’
सन 2025 हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यावर्षी आपले पवित्र संविधान 75 वर्षांचे होत आहे. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करत आपण “संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष” म्हणून साजरे करत आहोत. या पर्वात भारतीय लोकशाहीची उज्ज्वल वाटचाल, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक प्रगती यांचे स्मरण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. हा संयोग केवळ कालानुक्रमिक नाही, तर अर्थपूर्ण आहे, कारण डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यांचा एकत्र विचार केल्यास आपल्याला भारताच्या भूतकाळाच्या संघर्षांची जाणीव होते आणि भविष्यासाठी नवी दिशा मिळते. आज आपण जी लोकशाही, स्वातंत्र्य, हक्क आणि समतेची फळं चाखतो आहोत, ती बाबासाहेबांसारख्या थोर व्यक्तींमुळे शक्य झाली आहेत. त्यामुळे हे वर्ष केवळ उत्सवाचे नसून, “चिंतन, जागरूकता आणि कृती” यांचं वर्ष असलं पाहिजे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि ही तारीख “सामाजिक न्याय दिन”, “राष्ट्रीय प्रेरणा दिन” म्हणूनही ओळखली जाते.
संविधानाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि समावेशक संविधान मानलं जातं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणण्यात आलं. याच दिवशी भारताने प्रजासत्ताक देश म्हणून स्वतंत्र अस्तित्व स्वीकारलं. भारतीय संविधानाने आपल्या देशाला एक नवी दिशा दिली — जिथे धर्म, जात, वर्ग, लिंग यांच्यापलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीस समान हक्क, स्वातंत्र्य आणि संधी मिळते.संविधानाची प्रस्तावना “आम्ही भारताचे लोक…” अशा शब्दांनी सुरू होते. ही प्रस्तावना फक्त काही ओळी नाही, तर ती भारतीय राष्ट्राची आत्मा आहे. त्यात व्यक्त झालेले मूल्य – स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय – हे केवळ शब्द नाहीत, तर आपल्या राष्ट्रीय जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान तयार करणारे तज्ज्ञ नव्हते, तर समाजाच्या सर्व थरांना समान न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर झगडणारे क्रांतिकारक विचारवंत होते. ते कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, आणि समाजसुधारक होते. अस्पृश्यता, जातिभेद, सामाजिक विषमता याच्या विरोधात त्यांनी कट्टरपणे लढा दिला. त्यांचा भर शिक्षणावर होता – “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मंत्र होता. त्यांनी कामगार, महिला, मागासवर्गीय यांच्यासाठी अनेक कायदे आणि सुधारणांचा पाया रचला.त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे भारतीय संविधानाच्या मसुद्याचे नेतृत्व. त्यांनी असा मसुदा तयार केला जो लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेवर आधारित आहे.
अमृतमहोत्सवी वर्षाची प्रेरणा
75 वर्षे म्हणजे केवळ काळाचा तपशील नाही, तर ती एक संधी आहे – मागे पाहण्याची, शिकण्याची, आणि पुढे जाण्याची. या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्र व राज्य शासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांनी संविधान जागरूकतेसाठी अनेक उपक्रम आखले आहेत. जसे की संविधान वाचन कार्यक्रम , जनजागृती रॅली , शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व, पोस्टर स्पर्धा ,युवकांना संविधानिक मूल्यांबद्दल प्रशिक्षण ग्रामीण भागात माहिती प्रसार या सर्व उपक्रमांमागे एकच उद्दिष्ट आहे भारतीय संविधान सर्वसामान्य जनतेच्या मनात, वागण्यात, आणि कृतीत रुजवणे. संविधान आणि बाबासाहेब हे एक अविभाज्य नातं आहे .संविधान आणि बाबासाहेब यांचं नातं म्हणजे शरीर आणि आत्म्यासारखं आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, पण त्या मागे त्यांची समाजवादी, मानवतावादी आणि लोकशाही विचारसरणी होती. आज संविधानावर जेव्हा कुठलंही संकट येतं, तेव्हा आपल्याला बाबासाहेबांची आठवण होते. त्यांनी जे मूल्य रुजवले ते आपल्याला पुन्हा समजून घ्यावं लागतं. शालेय आणि सामाजिक पातळीवर असे काही उपक्रम राबवित येतील 1. शाळांमध्ये संविधान शिक्षण अनिवार्य करावं. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, कृतीशील कार्यक्रमातून मुलांना संविधान समजावं. 2. बाबासाहेबांचे विचार ‘प्रोजेक्ट बेस्ड’ अभ्यासातून शिकवावे. 3. संविधान दिन, आंबेडकर जयंती, प्रजासत्ताक दिन यांची सांगड घालणारे कार्यक्रम घ्यावेत. 4 .ग्रामपातळीवर लोकांना संविधानाबाबत जागरूक करणाऱ्या मोहिमा राबवाव्यात.
आजच्या काळात बाबासाहेबांचे विचार का महत्त्वाचे आहेत?
आजही आपण जातीयता, विषमता, आर्थिक असमानता, लिंगभेद यांसारख्या समस्यांचा सामना करतो. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार अधिकच सुसंगत वाटतात. शिक्षण: आजच्या युवकांना बाबासाहेबांचा शिक्षणावर असलेला भर समजून घेणं गरजेचं आहे. शिक्षण हे केवळ ज्ञान प्राप्त करण्याचं माध्यम नसून, सामाजिक बदलाचे साधन आहे. संघटन: सामाजिक चळवळींसाठी संघटित होणं, विचारांची देवाणघेवाण करणं हे आजच्या काळातही महत्त्वाचं आहे. संघर्ष: चुकीच्या गोष्टीविरुद्ध शांत, पण ठामपणे आवाज उठवणं ही बाबासाहेबांची शिकवण आहे.सध्या समाजाने ‘‘नको रंग धर्माचा, नको भेदभाव! असो बंधुभाव, असे संविधानाचं गाव!’’ या पद्धतीने राहणे अत्यावश्यक बनले आहे . बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करून आणि संविधानाचे मूल्य जपत आपण खर्या अर्थाने लोकशाहीला बळकटी देऊ शकतो. हेच या अमृतमहोत्सवाचे खरे सार आहे.
शासकीय कर्मचारी ,लोकसेवक यांची सांविधानिक जबाबदारी ;
संविधनाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि संविधानाच्या शिल्पकारांची जयंती साजरी होत असताना सध्या 100 दिवस कार्यालयीन कृती कार्यक्रमात सर्वजण व्यस्त असताना दिसून येत आहेत .ही महत्वपूर्ण घटना आहे . केवळ संविधानाच्या प्रस्ताविकेचे मोठाले बॅनर कार्यालयात दर्शनी भागात लावणे हे उदिष्ट न ठेवता सांविधानिक पद्धतीने जनतेला सेवा देणे परम कर्तव्य मानून काम होणे आवश्यक आहे.भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे संकलन नसून ते नैतिक मूल्यांचा मार्गदर्शक आहे. विशेषतः शासकीय अधिकारी व कर्मचारी हे संविधानाच्या अंमलबजावणीचे मूळ स्तंभ आहेत. त्यांचे वर्तन आणि कार्यपद्धती या संविधानिक मूल्यांशी सुसंगत असणे आवश्यक आहे.‘‘हक्कांची झेप घ्यावी उंच, पण जबाबदारीची ठेवावी ओळख! लोकशाहीचा सन्मान व्हावा, प्रत्येक कृतीत संविधान दिसावं!’’असे वर्तन अपेक्षित आहे लोकसेवकांनी ‘‘नाही सत्ता ही मिरवायची वस्तू, ती आहे सेवा करण्याची जबाबदारी! संविधानाच्या प्रत्येक अक्षरात, दडली आहे जनतेची प्रामाणिक अपेक्षा!’’ हे ओळखून आपले योगदान देशाच्या उन्नतीत द्यावे .
संविधानिक मूल्ये आणि त्यांचे प्रतिबिंब: भारतीय संविधानात स्पष्टपणे काही मूलभूत मूल्यांचा उल्लेख आहे. शासकीय सेवकांनी आपले वर्तन या मूल्यांच्या आधारे घडवले पाहिजे:
समता (Equality): प्रत्येक नागरिकाला समान वागणूक दिली पाहिजे, मग तो कोणत्याही जात, धर्म, वर्ग, लिंग वा भाषेचा असो. कार्यालयीन व्यवहारात पक्षपात, जातीपात किंवा साठवणीचा प्रभाव नको.
न्याय (Justice): प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वेळेवर निर्णय हे न्यायाचे प्रतीक ठरते. सेवा पुरविताना अपारदर्शक प्रक्रिया, लाचखोरी वा टाळाटाळ ही संविधानाच्या विरोधात आहे.
बंधुता (Fraternity): सहकार्य, आदर, संयम आणि सौहार्दाचे वातावरण राखणे. नागरिकांशी सौजन्यपूर्ण, समजूतदार आणि आदराने वागणे.
धर्मनिरपेक्षता (Secularism): कोणत्याही धर्माच्या आधारावर भेदभाव न करता सेवा देणे. वैयक्तिक धार्मिक श्रद्धा कार्यालयीन निर्णयांवर परिणाम करू नयेत. उत्तरदायित्व (Accountability): सार्वजनिक सेवक ही एक जबाबदारी आहे, अधिकार नव्हे. नागरिकांकडे उत्तरदायित्व असणे गरजेचे आहे.
संविधानिक संस्था आणि त्यांच्या अपेक्षा: भारताची संविधानिक लोकशाही व्यवस्था शासकीय अधिकाऱ्यांकडून खालील गोष्टी अपेक्षित करते:
लोकशाही मूल्यांचा सन्मान: नागरी स्वातंत्र्यांचा आदर,अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, मताधिकार या बाबींचा सन्मान
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी: गरिब, वंचित, ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे.प्रामाणिकपणा, पारदर्शकता व लोकाभिमुखता बाळगणे
भ्रष्ट्राचारविरोधी भूमिका: स्वतः भ्रष्टाचारापासून दूर राहणे,इतरांनाही त्या प्रक्रियेत अडकू न देणे .
सर्वसमावेशक प्रशासन: समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी प्रशासनिक दृष्टी ठेवणे . महिला, दिव्यांग, एससी/एसटी, अल्पसंख्यांक यांच्या विशेष गरजांकडे लक्ष देणे .
आदर्श वर्तनासाठी काही प्रमुख बाबी ; नागरिकांशी संवाद :- विनम्र, स्पष्ट, माहितीपूर्ण आणि वेळेवर उत्तर देणे ,कार्यालयीन व्यवहार :- कागदपत्रे वेळेत प्रक्रिया करणे, गैरसोयी टाळणे . निर्णय प्रक्रिया :- कायद्यानुसार, पारदर्शक आणि पक्षपातरहित निर्णय घेणे . जबाबदारीचे भान :- सार्वजनिक पैशाचा योग्य विनियोग आणि वेळेचे व्यवस्थापन . बदल स्वीकारणे: – तंत्रज्ञान, नागरिकाभिमुख धोरणे, प्रशिक्षण यामध्ये सकारात्मक सहभाग . अश्या पद्धतीने कार्य करता येईल .
लोकसेवकांचा आदर्श – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन:
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, “एक चांगली घटना असली तरी ती चुकीच्या माणसांच्या हातात असेल तर ती वाईट ठरते.” त्यामुळे संविधान जरी श्रेष्ठ असलं, तरी त्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी व कर्मचारी जर जबाबदार, नैतिक, पारदर्शक व लोकाभिमुख नसतील, तर लोकशाहीचा आत्मा संपतो.
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे संविधानिक मूल्यांचे जीवंत प्रतिनिधी आहेत. ते जर लोकाभिमुख, पारदर्शक, आणि समतेवर आधारित वर्तन करतील, तर संविधान केवळ कागदावर मर्यादित न राहता जनमानसात रुजेल. त्यामुळे त्यांचे वर्तन हे केवळ शासकीय प्रक्रिया नव्हे, तर लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवणारी क्रिया असते . 2025 मध्ये विशेषता:संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे त्यांच्या विचारांचा नव्याने जागर निर्माण करणं. शाळा, महाविद्यालये, संस्था आणि समाजाने यामधून प्रेरणा घेऊन सामाजिक समतेचा व लोकशाहीचा संदेश पोहोचवावा, ही या वर्षामागची भावना आहे.प्रत्येकाने हे मनाशी ठरवावे की ,
‘‘मी नाही केवळ नावापुरता,
मी आहे संविधानाचा शिलेदार ,
माझ्या हातात लोकशाहीचा दीप,
माझ्या पावलांनी होईल नवा प्रारंभ.’’
सचिन लक्ष्मण जाधव
देवगड 9421189369












