सावंतवाडी : कै. प्रभाकर वासुदेव आराबेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी रुग्णांच्या उपयोगासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला ३५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला.
कै. प्रभाकर आराबेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुमेधा आराबेकर यांनी रुग्णांना मदत व्हावी या उदात्त हेतूने हे योगदान दिले आहे.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याची शिफारस श्रीमती आराबेकर यांच्याकडे केली होती. तसेच, कळसुलकर शाळेचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद गोटस्कर यांनी या संस्थेचे नाव सुचवले होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे आणि जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी श्रीमती सुमेधा आराबेकर यांच्या या उदार कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. रवी जाधव यांनी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या मिळालेल्या देणगीतून लवकरच रुग्णांसाठी आवश्यक वस्तू खरेदी करून रुग्णालयात पुरवल्या जातील, असे आश्वासन रवी जाधव यांनी दिले आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असते आणि या कार्याला अनेक दानशूर व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे, याबद्दल रवी जाधव यांनी आभार व्यक्त केले आहेत.











