खुल्या गटात वरद पेठे तर महिला गटात सई प्रभुदेसाई विजेती
रत्नागिरी – जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात दि. १७ व १८ रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धांना रायसोनी फौंडेशन तर्फे विशेष सहकार्य लाभले होते. खुल्या व महिलांच्या गटातून ४ -४ खेळाडूंची निवड राज्य निवड स्पर्धेसाठी करण्यात आली.
दि. १८ रोजी खुल्या व महिला गटांच्या निवड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला फिडे मानांकित खेळाडू व भारतीय जीवन विमा निगम रत्नागिरी येथे विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. अनंत गोखले व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव, अभाविप प्रदेश अध्यक्ष, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट व व्होकेशनल बोर्ड अश्या विविध आघाड्यांवर कार्यरत असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते. श्री. दुदगीकर यांनी बुद्धिबळ हा खेळ आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्वावर कसा बदल घडवू शकतो ह्यावर खेळाडूंना संबोधित केले. एकाग्रता, सय्यम, मेहनत आणि चिकाटी ही यशाची चतुःसूत्री मुलांना सांगत उपस्थित पालकांची वाहवा मिळवली. त्यांच्या हस्ते खालीलप्रमाणे विजेत्यांना गौरविण्यात आले. निधी मुळ्ये हिने तुलनेने अधिक काठीण्य पातळी असलेल्या खुल्या गटात खेळून आपल्या खेळाचा कस पणाला लावत खुल्या गटातून खेळूनही जिल्हा संघात स्थान मिळवले. वरद पेठे (६/६) व सई प्रभुदेसाई (५.५/६) यांनी आपापल्या अपराजित राहून स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. अनिकेत रेडीज, यश गोगटे यांनी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ केला.











