चिपळूण (प्रतिनिधी)- : यावर्षी मे महिन्यातच जोरदार पाऊस झाला. यातून निसर्गाचा समतोल ढासळला आहे हे स्पष्ट होते. खरंतर निसर्ग बोलत नसला तरी तो अशा पद्धतीने व्यक्त होत असतो, असे मत प्रसिध्द अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी वृक्षारोपण हे काम कुण्या एकाचे नव्हे, तर त्याची चळवळ व्हायला हवी. यासाठी लोकसहभाग वाढायला हवा, अशी भावनाही मांडली.
महाराष्ट्र शासन वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत पिंपळी खुर्द, केदार काळकाई इंटरप्रायजेस यांच्या माध्यमातून नुकतेच पिंपळी खुर्द येथील श्री केदार सुकाई मंदिर कमान येथे अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड व मियावाकी जंगल निर्मितीचा शुभारंभ झाला. यावेळी प्रांताधिकारी व श्री. अनासपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर छोटेखानी कार्यक्रम झाला. पिंपळी सरपंचांनी श्री. अनासपुरे यांचे स्वागत केले.
यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले की, आज निसर्ग आपल्याला सूचना देत आहे. त्यामुळे निसर्ग जपला पाहिजे, पिंपळी ग्रामपंचायतीने प्लास्टीक बंदीचा निर्णय घ्यावा. भविष्यात प्लास्टीकमुळे पाणी टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे आत्तापासून प्लास्टीकमुक्तीसाठी पुढे यायला हवे, असा संदेश अनासपुरे यानी दिला. आम्ही राज्यभरात वृक्षारोपण करीत आहोत. पुण्यातील खडकवासला धरणाच्या बाजूला मोठे जंगल उभे राहिले आहे त्या ठिकाणी जैवविविधता निर्माण झाली आहे. जैवविविधता वाढली तरच निसर्ग टिकेल. मात्र, हे काम कुणा एकट्याचे नाही, त्यासाठी लोक सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येकाने या कार्यात सहभाग ध्यायला हवा, या कार्यक्रमाला सर्वांची साथ मिळाली तर ही मोहीम पुढे जाईल व त्याचे चळवळीत रूपांतर होईल. लावलेली झाडे जगवली पाहिजेत, त्यामुळे प्रत्येकाने लावलेल्या झाडाची जबाबदारी घ्या आणि ती जगवा, असे आवाहनही श्री. अनासपुरे यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी लिगाडे व मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी लागवडीसाठी वृक्षरोपे देऊन सामाजिक वनीकरण विभागाने मोठे सहकार्य केले. यापुढेही वृक्षरोपे देण्याचे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला नामचे कोकण विभाग समन्वयक समीर जानवलकर, जलदूत शाहनवाज शाह, नामचे महेंद्र कासेकर, पिंपळीच्या सरपंच अंजली जांबुर्ग, चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, सामाजिक कार्यकर्ते कैसर देसाई, सरपंच अंजली जांबुर्ग, ग्रा. प. सदस्य रवींद्र सागवेकर, देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद कडव माजी सरपंच नदा सागवेकर, ज्येष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र चव्हाण तसेच आजी-माजी सदस्य, सरपंच, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
–











