माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे शनिवारपासून रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे हे शनिवार ३१ मे आिण रविवार १ जून अशा दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत खा. नारायण राणे हे शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असून या बैठकित ते नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवार ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता खा. नारायण राणे हे रत्नागिरीत दाखल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. या आढावा बैठकीत जिल्ह्यात अतीवृष्टी काळात झालेले नुकसान, केलेल्या उपाययोजना याबाबतचा आढावा घेणार आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात घ्यावयाची खबरदारी याबाबत ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

आढावा बैठकीनंतर दुपारी २ वाजता खा. नारायण राणे हे चिपळूण येथे दाखल होणार आहेत. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ते भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यानंतर त्याच ठिकाणी खा. राणे हे जनतेची गाऱ्हाणी ऐकणार असून विकासात्मक कामांबाबतची निवेदने स्विकारून जनतेशी संवाद साधणार आहेत.

रविवार १ जून रोजी खा.नारायण राणे हे सकाळी ११ वाजता राजापुरात दाखल होणार आहेत. या ठिकाणी ते राजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.