आजगाव केंद्र शाळेच्या उच्चश्रेणी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ममता जाधव यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : शिक्षकी पेशा म्हणजे समाज घडवणारे व्रतस्थ कार्य, जो कधी थकत नाही, दमून माघार घेत नाही, तर सातत्याने अध्ययनाने परिपूर्ण बनतो. अशाच एक आदर्श शिक्षिका ममता मोहन जाधव, ज्यांनी गायन, वादन, ज्ञान आणि समाजकारण या सर्व क्षेत्रांत आपले योगदान दिले, त्यांच्या कार्याचे कौतुक करताना जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक तथा समता प्रेरणाभूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर यांनी त्यांचे शिक्षकी कार्य अमृतस्वरूपाचे असल्याचे गौरवोद्गार काढले तसेच नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आजगाव केंद्र शाळेच्या उच्चश्रेणी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील आघाडीच्या महिला कार्यकर्त्या ममता मोहन जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शेरले सिद्धार्थ नगर येथे आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विजय नेमळेकर होते.
यावेळी व्यासपीठावर तथागत नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, जनवादीचे अंकुश कदम, अशोक कदम, मीनाक्षी तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर मोहन जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना दीपक पडेलकर यांनी, निवृत्ती ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून सृष्टीचा अविभाज्य भाग आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे आपली सूत्रे सोपवणे हे निसर्गाचे चक्र आहे. ममता जाधव यांनी आपली कर्तव्ये विहितपणे पार पाडून आपल्या व्यवसायाचा खरा आनंद घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले. वादापेक्षा संवादावर भर देणे, अपार कष्ट करणे, समोरच्या व्यक्तीशी मैत्रीपूर्ण आणि आदरपूर्वक व्यवहार करणे, तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणे, हे त्यांचे विशेष गुण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे हित आणि समाजाप्रती बांधिलकी हाच त्यांचा स्थायीभाव होता, असे सांगून त्यांनी ममताताईंच्या विविध पैलूंचे कौतुक केले.
सूर्यकांत कदम यांनी ममताताईंनी आपल्या सेवानिवृत्तीचा काळ आमच्या सेवानिवृत्त संघटनेत सक्रिय होऊन समाजाची सेवा करावी, असे आवाहन केले. तर अरविंद वळंजू यांनी तथागत पतसंस्थेच्या माध्यमातून समाजात विविध उपक्रम राबवून समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा जो प्रयत्न करत आहोत, त्यात ममताताईंनी सहभागी होऊन तो पूर्ण करावा, असे आवाहन केले. यावेळी अंकुश कदम, मीनाक्षी तेंडुलकर, संतोष कदम, प्रा. रुपेश पाटील, साक्षी खानोलकर, श्रद्धा कदम, संतोष कदम आदींनी शुभेच्छा दिल्या.
या सत्काराला उत्तर देताना ममताताईंनी आपला संघर्षाचा काळ स्पष्ट करून कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा चिटणीस संजय पेंडुरकर, बामसेफ जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधव, सेवानिवृत्त नगर रचनाकार पी. एल. कदम, बँक अधिकारी आर. डी. कदम, निलेश जाधव, पत्रकार क्रांतिराज सम्राट, कसवनचे सरपंच मिलिंद सरपे, यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी सचिव मयूर चराठकर, ज्येष्ठ सदस्य राजू तावडे यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.











