रत्नागिरी ः दोन दिवसांपूर्वी शहरातील संसारे गार्डन समोरील अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीत पोलिसांनी जप्त केलेले मांस गोवंशाचे नसून बोकडाचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हे मांस सिरोही जातीच्या बोकडाचे असून, मांसाचे अन्य अवशेषही तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामुळे गोवंश हत्येवर पडला आहे.
मंगळवार दि. 3 जून रोजी सायंकाळी 6.00 वा.सुमारास मारुती मंदिर नजिक एकता मार्गावरील संसारे उद्यानासमोर एका प्राण्याचा पाय आढळून आला होता. तो पाय गोवंशाचा असल्याचा संशयावरून सकल हिंदू समाज आक्रमक झाला. अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वॉचमन आपल्या खोलीत पिशवी घेऊन जाताना दिसल्यामुळे नागरिकांसह पोलिसांनी त्याच्या खोलीची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान एका टबमध्ये प्राण्याच्या पायासह काही मांस आढळून आले होते.
हिंदूच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी मांस जप्त करत वॉचमन पतीपत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर या घटनेचा स्वतंत्र तपास पोलिसांनी सुरू केला. वॉचमन रणजीत दमाई याची चौकशी केल्यानंतर त्याने वस्तुस्थिती कथन केली. नासीर मुल्ला याने सिरोही जातीचा बोकड राजस्थान येथून आणला होता. हवामानातील बदलामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला उद्यमनगर येथील पशुचिकित्सालय येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून घरी आणण्यात आले. परंतु मंगळवारी त्या बोकडाचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या बोकडाची विल्हेवाट लावण्यासाठी मुल्ला याने नगरपालिकेच्या घंटागाडीत देण्याचा प्रयत्न केला. परंतु मृतप्राणी घेत नसल्याचे पलिका कर्मचाऱ्यांनी सांगितले अखेर रणजीत दमाई याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांना पैसे देऊन मृत बोकड पुरण्यासाठी देण्यात आला. त्यासाठी मारुतीमंदिर येथून एक टेम्पो आणण्यात आला. वॉचमन व त्याचे सहकारी बोकड घेऊन आले. त्यानंतर मृत बोकड पुरण्याऐवजी तो कापून त्याचे वाटे घालण्यात आले. तर बोकडाचे डोके एका नेपाळ्याचे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.
रणजितने पोलिसांकडे घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी पशुचिकित्सालय, पालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचारी, टेम्पोचालक यांच्या याची खातरजमा केली. रणजितने सांगितलेली माहिती पुर्णतः खरी निघाली. त्यानंतर पोलिसांनी बोकडाच्या डोक्यासहीत वाट्यातून इतरांकडे गेलेले मांस एकत्र करत ते तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहे. परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात ते मांस सिरोही बोकडाचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या नेपाळी दाम्पत्यासह नासीर मुल्ला यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.









