शिरगावच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उद्योजकांचे मार्गदर्शन

करिअर कट्टा आणि कर्ले महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार

शिरगाव ( प्रतिनिधी )  महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमात आता शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाचा समावेश झाला आहे. यानुसार, २७ मे रोजी कोल्हापूर येथे झालेल्या समारंभात दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

हा समारंभ कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, सांगली जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. पूजा नरवाडकर, कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समीर तारी, शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम, व महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा. अक्षता मोंडकर उपस्थित होत्या.

या सामंजस्य करारामुळे कर्ले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १०० हून अधिक जागतिक पातळीवरील उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र ग्लोबल या माध्यमातून परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय तज्ज्ञांकडून नोकरी, व्यवसाय, उद्योजकता आणि करिअर प्लॅनिंगबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षा, भरतीपूर्व प्रशिक्षण, बँकिंग क्षेत्र यासारख्या बाबतीतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

शिरगाव दशकोशीतील विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत उपयुक्त संधी ठरणार आहे. या सामंजस्य कराराबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संस्थापदाधिकारी, संचालक आणि प्राचार्य डॉ. समीर तारी यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे आभार मानले आहेत.