ढोक्रवलीत ‘सेवा संकल्प’ अभियानातून विसर्जन मार्गाची स्वच्छता

मधलीवाडी ते गणपती विसर्जन घाटापर्यंतचा २ किमी मार्ग झाडाझुडपांमुक्त; भाविक व ग्रामस्थांची गैरसोय दूर

मंडणगड (प्रतिनिधी)

चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली मधलीवाडी ते गणपती विसर्जन घाट व नदीपर्यंतच्या सुमारे २ किलोमीटर मार्गावर वाढलेल्या झाडाझुडपांची साफसफाई करून रस्ता स्वच्छ करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी , ओबीसी मोर्चा, चिपळूण तालुका ग्रामीण च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात गणपती विसर्जनासाठी तसेच नदीवर ये-जा करण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा झाडीझुडपे वाढल्याने भाविक व ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या सोयीसाठी रस्त्यावरील वाढलेली झाडेझुडपे हटवून मार्ग स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर तसेच भाजपा चिपळूण तालुका ग्रामीण अध्यक्ष उदय घाग यांनी पुढाकार घेतला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचा मार्ग स्वच्छ व अधिक सुकर झाल्याने भाविक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ‘सेवा संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल ढोक्रवली ग्रामस्थांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.