सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी गुरुवारी मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना तटकरे यांनी, वारंग यांना पक्षात योग्य तो मान-सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
उमाकांत वारंग हे सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी सावंतवाडी सहकारी पतपेढी, सावंतवाडी अर्बन बँक आणि आयुर्वेद कॉलेज सावंतवाडी येथे संचालक म्हणून काम पाहिले आहे. तसेच, ते कंझुमर सोसायटीचेही संचालक आहेत. सावंतवाडीमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या या जनसंपर्काचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनीही यावेळी बोलताना, वारंग यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या संघटनेला बळकटी मिळेल आणि जिल्ह्यात त्यांना योग्य सन्मान दिला जाईल, असे सांगितले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस संजय बोरगे, लतिफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले आणि केदार खोत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.