देवगडच्या अमोल मेस्त्री यांचे टेनिस क्रिकेट पंच परीक्षेत उल्लेखनीय यश

देवगड- प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनशी संलग्न असलेल्या टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल सभागृहात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षेत देवगड येथील अमोल अशोक मेस्त्री यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ते एकमेव प्रविष्ठ झाले होते. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

नाशिक येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गुजर यांच्यासमवेत भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महाराष्ट्र उमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र टेनिस टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील ठोंबरे, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड आदी उपस्थित होते. श्री. गुजर यांनी विद्यार्थ्यांना टेनिस खेळाबद्दल माहिती व महत्व सांगितले. संदीप पाटील यांनी दोन दिवसीय पंच परीक्षा कालावधीत टेनिस क्रिकेट खेळाची नियमावली स्पष्ट करून टेनिस क्रिकेट खेळातील विविध पैलू प्रात्यक्षिकाद्वारे उलगडवून सांगितले. या परीक्षेमध्ये भारतातील मध्यप्रदेश, झारखंड, पुणे, नाशिक, रांची आदी भागातील एकूण २८ जण प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेमध्ये धनश्री गिरी, दर्शन थोरात, नंदकिशोर नाईक यांनी ए प्लस ग्रेड मिळवून भारतात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनाही श्री. गुजर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्री. मेस्त्री यांनी या परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळविले आहेत. देवगड येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असतानाच श्री. मेस्त्री यांनी टेनिस क्रिकेटचेही धडे गिरविण्यास सुरुवात केली होती. देवगड कॉलेजमार्फत खेळताना त्यांनी वेंगुर्ले येथील गावसकर स्टेडियमवरील टेनिस क्रिकेट स्पर्धेत १२३ धावांची पहिली शतकी खेळी केली आहे. यंगस्टार, सदा स्पोर्टस् वेंगुर्ले आदी नावाजलेल्या संघामधून सहभागी होत त्यांनी नामांकित क्रिकेट स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक यापूर्वी दाखविली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येही भरविल्या जाणाऱ्या प्रोफेशनल टेनिस वि केट स्पर्धेत दिग्गज खेळाडूंसमवेत त्यांनी क्रिकेट मैदान गाजविले आहे.

 

लवकरच राष्ट्रीय स्तरावर टेनिस क्रिकेट स्पर्धा

 

श्री. मेस्त्री म्हणाले, टेनिस क्रिकेट खेळातील आपल्या यशात अमरेश मित्रमंडळाचे मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रीय स्तरावर टेनिस क्रिकेट खेळाला सर्वोत्तम दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ‘टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया’ अथक मेहनत घेत आहे. असोसिएशनमार्फत लवकरच राष्ट्रीय स्तरावर ‘डीएलएफ’ टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार असून त्याचे प्रतिनिधीत्व सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हे करणार आहेत. स्पर्धेसाठी चांगले पंच उपलब्ध होऊ व्हावेत, या हेतूने स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून असोसिएशनमार्फत राष्ट्रीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा घेण्यात आली. ही स्पर्धा टेनिस क्रिकेटसाठी भविष्यात सुवर्णकाळ निर्माण करून देणारी ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.