परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे: दिलीप भालेकर

परीट समाज संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री संत गाडगे महाराज परीट समाज संघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात, समाजाच्या उन्नतीसाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले. प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या भक्त निवास सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या परीट समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दिलीप भालेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, परीट समाजाच्या प्रगतीसाठी समाज बांधवांनी एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे. परीक्षेतील अपयशाने खचून न जाता पुन्हा यशासाठी प्रयत्न करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. यापुढील काळात संघामार्फत शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. हा सोहळा जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. व्यासपीठावर महिला जिल्हाध्यक्ष सौ. दिपाली भालेकर, उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, प्रसाद पाटकर, विलास साळसकर, धनश्री चव्हाण, सचिव अनिल शिवडावकर, सहसचिव गुरुनाथ मडवळ, खजिनदार संदीप बांदेकर, सहखजिनदार अशोक आरोलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनिल शिवडावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ. दिपाली भालेकर, विलास साळसकर, प्रदीप नारकर, राजेंद्र भालेकर, शरद परीट आणि दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, गाडगे महाराजांची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत शहाकार यांनी केले, तर कणकवली तालुकाध्यक्ष भालचंद्र करंजेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रसाद पाटकर यांनी आभार मानले. या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाजाचे बांधव, भगिनी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.