सावंतवाडीत ठाकरे गटाला धक्का 

माजगावमधील पदाधिकारी शिवसेनेत दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत, आणि ग्रामपंचायत सदस्य सौ. पूजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

या नेत्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतला. तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख संजय माजगावकर आणि माजगाव विभागप्रमुख उमेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथील कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खारभूमी-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे उपस्थित होते.

या पक्षप्रवेशावेळी उबाठा पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख श्रीमती रश्मी पावसकर, सौ. ममता दळवी, नंदा भोगण, राजश्री तळवडेकर, सौ. सपना पेडणेकर, तसेच पदाधिकारी श्री. मनोहर दळवी, श्री. लवित सावंत, श्री. संतोष मयेकर, श्री. लवू चव्हाण, संदीप गावडे यांच्यासह असंख्य उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.

या मोठ्या पक्षप्रवेशामुळे माजगाव गावात उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले असून, शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे.