रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा नजीकच्या भोके फाटा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ कनगुटकर (७२) यांचे दुर्दैवी निधन झाले. या अपघाताचे वृत्त समजताच त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांसह संपूर्ण रत्नागिरी परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुरुनाथ कनगुटकर हे शनिवारी सायंकाळी 6.45वाजण्याच्या सुमारास भोके आंबेकर वाडी या आपल्या मूळ गावातून हातखंबा मार्गे खेडशी येथील आपल्या घराकडे येण्यासाठी निघाले होते. ते गावातील अंतर्गत रस्त्यावरून महामार्गावर येत असतानाच, हातखंबाकडून निवळीच्या दिशेने अतिवेगाने जाणाऱ्या एका ‘एफ झेड’ मोटरसायकलने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही गाड्या रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटत गेल्या. अपघातात गुरुनाथ कनगुटकर हे गंभीर जखमी झाले, तर एफ झेड मोटरसायकलवरील चालक तरुणही जखमी झाला.अपघातानंतर दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गुरुनाथ कनगुटकर यांचा मृत्यू झाला होता. तर अपघातातील जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मृत्यू पावलेले गुरुनाथ कनगुटकर हे भोके गावातील शाळेत प्रदीर्घ काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे ते संपूर्ण गावात अत्यंत लोकप्रिय होते. त्यांनी घडवलेले असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. आपल्या लाडक्या सरांच्या अशा अचानक आणि अपघाती जाण्याने त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लक्ष्मण कोकरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते. महामार्गावरील वेगाच्या मर्यादा आणि वाढते अपघात आता निष्पाप नागरिकांचे जीव घेत असल्याने स्थानिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.











