आरोग्य सेवा विस्कळीत : रुग्णसेवा धोक्यात
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य संलग्न सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) १०८ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे आधीच आरोग्य सुविधांच्या बाबतीत गोवा-बांबोळी येथील रुग्णालयांवर अवलंबून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मोठा फटका बसला आहे.
*काय आहेत प्रमुख मागण्या*
१०८ रुग्णवाहिका चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वावर १४ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन आणि भत्ते देण्याची मागणी आहे. याशिवाय, ८ तासांपेक्षा जास्त कामासाठी दुप्पट दराने मोबदला, सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा आणि रजेचे वेतन, कॅशलेस आरोग्य विमा, ८.३३ टक्के वार्षिक बोनस, वाहन धुलाई भत्ता, दर महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन, ५ वर्षांनंतर ग्रॅज्युटी आणि पूर्ण भत्ते (फुल अलाऊन्स) या मागण्यांचा समावेश आहे. आरोग्यमंत्र्यांनी या मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या संपामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक वाईट परिणाम दिसून येत आहे. लहान-सहान कारणांसाठीही गोव्याला रेफर होणाऱ्या गरीब रुग्णांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
*स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात*
या गंभीर परिस्थितीत रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. सावंतवाडी तालुक्यातील रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा गोवा-बांबोळी येथे नेण्यासाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, रवी जाधव, रूपा मुद्राळे आणि लक्ष्मण कदम यांनी ही सेवा देण्याची घोषणा केली आहे. ही स्वयंसेवी संस्थांची मदत रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे.












