वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली संगमेश्वरमध्ये ₹२.२९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

रत्नागिरी : ऑनलाइन वर्क फ्रॉम होम देतो, असा विश्वास दाखवून टेलिग्रामवरील ‘कस्टमर सपोर्ट’ नावाच्या ग्रुपमधील प्रतिनिधींनी एका नागरिकाकडून तब्बल ₹२,२९,१३२ इतकी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात ३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीची घटना २३ ते २९ जून २०२५ या कालावधीत तालुक्यातील गोळवली बौद्धवाडी येथे घडली. पीडित व्यक्तीस ‘कस्टमर सपोर्ट’ या टेलिग्राम ग्रुपवरील हिना या प्रतिनिधीने संपर्क साधून वर्क फ्रॉम होम विषयी माहिती दिली आणि त्यानुसार काम सुरू करण्यास प्रवृत्त केले.

कामाचे टास्क पूर्ण करण्यासाठी आगाऊ रक्कम भरण्याचे सांगून निखिल पाटील (ग्रुप ओनर), विघ्नेश (ॲडमिन) आणि सुमित (टाटा क्लिक कंपनीचा कथित सीनियर प्रमोटर) या सर्वांनी पीडितास वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम भरायला भाग पाडले.

फसवणुकीची एकूण रक्कम ₹२,२९,१३२ असून ही रक्कम परत न मिळाल्यामुळे पीडिताने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.