दिया मेस्त्री व यश सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दिया भिकाजी मेस्त्री (खुला गट) आणि यश प्रवीण सावंत (लहान गट) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

पुण्यश्लोक पंचम खेम सावंत उर्फ बापूसाहेब महाराज यांचे जीवनकार्य आणि इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या लहान गटात यश प्रवीण सावंत याने प्रथम क्रमांक पटकावला, तर हंसिका जगन्नाथ वजराटकर द्वितीय आणि निधी सचिन सोनवडेकर तृतीय क्रमांकावर राहिले. खुल्या गटामध्ये दिया भिकाजी मेस्त्रीने पहिला क्रमांक मिळवला, तर प्राजक्ता परशुराम मोरजकर द्वितीय आणि युक्ता प्रसाद सापळे तृतीय स्थानी निवडल्या गेल्या.

या स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळ्याला अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडीचे समिती प्रमुख रामचंद्र परब, समिती समन्वयक नंदू गावडे, भगिनी मंडळ सदस्य व माजी अध्यक्षा अदिती सावंत, स्वाती सावंत, काजरेकर मॅडम, अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, दुर्गसंशोधन व इतिहास संशोधन विंग जिल्हाध्यक्ष गणेश नाईक, शैलेश घोगळे, योगेश काळप आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी इंदू डगरे आणि गणेश नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय गायकवाड यांनी केले, तर गणेश नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.