तालुक्यातील गवाणे येथील विवाहित महिला बेपत्ता

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील गवाणे रामाणेवाडी येथील वैष्णवी रामाणे ही ३८ वर्षीय विवाहित महिला ६ जून पासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबियांकडून लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी विजय रामाणे (वय-३८, रा.रामाणेवाडी-गवाणे, ता.लांजा) ही मंगळवार दि.६ जून रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तिचा चुलत दीर नितेश सिताराम रामाणे (वय-३८, रा.गवाणे-रामाणेवाडी) याला, त्याचा सख्खा भाऊ योगेश सिताराम रामाणे (वय-४२, रा.रामाणेवाडी) याला लांजात सोडण्यासाठी जाते आणि मुलांचे कपडे लांजा येथील भाड्याच्या खोलीत ठेवून येते असे सांगून निघून गेली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिचा पति विजय पांडुरंग रामाणे (वय-४८, रा.रामाणेवाडी-गवाणे, ) यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे चौकशी करून, सर्वत्र शोध घेऊनही चार दिवसानंतर पत्नीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे विजय रामाणे यांनी लांजा पोलीस ठाण्यात पत्नी वैष्णवी रामाणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
वैष्णवी रामाणे हिची उंची ५ फूट, रंग गोरा, चेहरा उभट, गळ्यात सोन्याचे छोटे मंगळसूत्र, चॉकलेटी रंगाची लेडीज पर्स तसेच ती अंगाने सडपातळ असून तिने घरातून जाताना ऑफव्हाईट कलरची साडी व ब्लाऊज, काळपट रंगाच्या स्कार्फने चेहरा झाकलेला होता. तरी या वर्णणाची स्त्री कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलीसांकडून करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास पो.हेड.कॉन्स्टेबल एन.एस.नावलेकर करीत आहेत.