१ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्यांचे सेवन; बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यावर भर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमधील जंतांचा प्रादुर्भाव रोखून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय, कसोप-फणसोप, ता. जि. रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती अर्चना साळवी यांनी भूषविले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कमलाकर साळवी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी, जिल्हा परिषद पी एच एन श्रीमती प्रिया पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेत्रा दिलीप राजेशिर्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी यांनी जंतनाशक मोहिमेबाबत माहिती दिली.
बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास हे मोहिमेचे उद्दिष्ट
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी केंद्रे, शाळा, महाविद्यालया मध्ये आरोग्य विभागामार्फत मोफत अल्बेन्डाझॉल या जंतनाशक गोळ्यांचे सेवन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. बालकांमधील जंतांचा प्रादुर्भाव कमी करणे, रक्तक्षयाचा धोका कमी करण्यास मदत करणे, पोषणस्थिती सुधारणे तसेच शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास बालकांच्या आरोग्यावर, पोषणावर आणि अभ्यासातील एकाग्रतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पात्र वयोगटातील सर्व मुला-मुलींना नियमानुसार जंतनाशक गोळ्यांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.
पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.या कार्यक्रमास अधिकारी आरोग्य कर्मचारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांच्या सेवनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे सेवन करण्यास देण्यात आले.
दि.३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप फेरीचे आयोजन :
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्य मोहीम राबविली असून, या दिवशी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र मुला-मुलींसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप फेरी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-(डॉ.अनिरुद्ध आठल्ये),
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी.














