कुवे संघर्ष समिती व कुवेत वासीयांच्या आंदोलनाला यश

१५ दिवसात कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्याचे नगरपंचायत प्रशासनाचे पत्र 

लांजा (प्रतिनिधी) कचरा प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध सुरू असून पुढील पंधरा दिवसात योग्य जागा मिळाल्यानंतर प्रभाग १७ मधून घनकचरा प्रकल्प स्थलांतरित केला जाईल, असे लेखी पत्र नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी कुवे संघर्ष समितीला दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे .

लांजा नगरपंचायतीच्या वतीने कुवे येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने याबाबत तातडीने दखल न घेतल्यास येत्या बुधवारपासून कचऱा टाकण्यास मज्जाव करणार तसेच कचऱ्याच्या गाड्या देखील अडविल्या जातील, असा इशारा कुवे ग्रामस्थ व संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी लांजा नगरपंचायतीला देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सोमवारी सायंकाळी कुवे संघर्ष समितीला लेखी पत्र दिले आहे. घनकचरा प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध घेणे चालू आहे.योग्य ती जागा प्राप्त होतात आपल्या प्रभाग क्रमांक १७ मधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थलांतरित केला जाईल.कचरा प्रकल्पाची जागा दुसऱ्या ठिकाणी बदलण्यासाठी नगरपंचायत सकारात्मक असून जागेचा शोध घेणे सुरूच आहे .तरी पुढील पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे .त्यासाठी सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १६ मधील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही देखील नगरपंचायतीकडून सुरू करण्यात येणार आहे .तसेच रस्त्यातील मोरीची साफसफाईकामी संबंधित विभागाकडे कर्मचारी यांना पाठवले होते. मात्र सदरची मोरी काही प्रमाणात साफ करण्यात आली असून प्रत्यक्ष पाहणी केली असता सदरची मोरी नादुरुस्त असल्याने बदलण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे कामाची तांत्रिक पुर्तता पूर्ण केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पत्र मुख्याधिकारी तुशार बाबर यांनी कुवे संघर्ष समितीला दिले आहे.

त्यामुळे घनकचरा प्रकल्पा विरोधात कुवे संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी छेडलेल्या लढ्याला यश आले आहे.